Join us

शेतकरी बांधवांनो; भगरीतून विषबाधा होण्याची कारणे जाणून घ्या, मगच भगर खा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 3:14 PM

अलीकडेभगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे भगरीचे सेवन करताना दक्षता बाळगणे आवश्यक आहे. तसेच भगरीचे सेवन करताना काळजी घेण्याचा सल्ला अन्न व औषध विभागाने दिला आहे.

अलीकडे लोणार तालुक्यात भगरीतून विषबाधा झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी भगरीचे सेवन करताना काळजी घेण्याचा सल्ला अन्न व औषध विभागाने दिला आहे.

वर्षाच्या इतर कोणत्याही हंगामापेक्षा उन्हाळ्यात अन्नातून विषबाधा होण्याचे प्रमाण अधिक राहते. त्यामुळे नागरिकांनी उन्हाळ्यात अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. उन्हाळ्यातील हवामान हे अन्न विषबाधा करणाऱ्या जीवाणूंसाठी अनुकूल असते. खुल्या जागेत व रेफ्रिजरेशनच्या सुविधा नसलेल्या ठिकाणी अन्नपदार्थ तयार केल्याने अन्न विषबाधेचा धोका वाढतो.

अलीकडे जिल्ह्यात भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे भगरीचे सेवन करताना दक्षता बाळगणे आवश्यक आहे. भगर तयार करताना प्रामुख्याने वरई, सावा, बर्टी व कोद्रा या धान्याचा वापर करतात. त्यानुसार, भगरीचे प्रकार पडतात.

या भगरीमध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, तसेच कॅल्शिअम, फॉस्फरस, मॅग्नेशियम यांसारखी खनिजे असतात.  मधुमेही रुग्णांसाठीही भगर उत्तम आहार समजला जातो. असे असतानाही सत्त्वगुणी भगर आरोग्याला अपायकारक ठरत असल्याचे काही घटनांमधून दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी भगर खाताना ती व्यवस्थित आहे का? भगरीवर बुरशीचा प्रादुर्भाव झाला का? याची खातरजमा करणे आवश्यक आहे.

चार मित्रांनी उभारला नैसर्गिक ऊस उत्पादनाचा ब्रॅंड 

"का होते भगरीतून विषबाधा?"

मुदतबाह्य विक्री : भगर खरेदी करताना सर्वात अगोदर एक्स्पायरी अर्थात, मुदत तपासावी. मुदतबाह्य भगरीतून विषबाधा होण्याची अधिक शक्यता असते.

बुरशीचा प्रादुर्भाव : भगरीवर मोठ्या प्रमाणात बुरशीचा प्रादुर्भाव होतो, ज्यामुळे त्याच्यावर विषद्रव्ये तयार होतात. २५ ते ३२ सेल्सिअस तापमान व आर्द्रता हे बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल असते. अशी बुरशीचा प्रादुर्भाव झालेली भगर खाण्यात आल्यास अन्न विषबाधा होऊ शकते.

अन्न व औषध प्रशासन सजग

बिबी पोलिस स्टेशन हद्दीत २० फेब्रुवारी रोजी सोमठाणा खापरखेड येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे सप्ताहाच्या महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. सोमवारी एकादशी उपवास असल्यामुळे संध्याकाळच्या फराळासाठी भगर व आमटी करण्यात आली होती. या भगरचे सेवन केल्याने अनेकांना मळमळ व उलटी होणे असा त्रास सुरू झाला होता. या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासन अधिक सजग झाले आहे.

काय काळजी घ्याल?

सुटी भगर न घेतलेली बरी : भगर खरेदी करताना शक्यतो पाकीटबंद घ्या, सुटी भगर घेण्याचे टाळावे.

मुदत पाहा : भगर खरेदी करताना पाकिटाचे लेबल तपासावे, बेस्ट बिफोर अवश्य तपासून घ्यावे व त्यानंतरच भगरीची खरेदी करावी.

आधी स्वच्छ करा : बाजारातून भगर आणल्यानंतर ती निवडून स्वच्छ करा, भगर साठविताना स्वच्छ, कोरड्या डब्यात ठेवा.

टॅग्स :शेतकरीशेतीअन्नातून विषबाधाअन्ननवरात्री उपवास आणि पदार्थ २०२३