थंडीत वातावरण आल्हाददायी वाटत असले तरी या दिवसांत हृदयविकार आणि ब्रेनस्ट्रोकचे प्रमाण वाढते. मागील काही दिवसांपासून सोलापूरच्या तापमानात सातत्याने बदल होत आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम आरोग्यावर होत आहे. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, आदी विविध प्रकारच्या संसर्गजन्य आजारांबरोबरच हृदयविकार, किडनी, मेंदूच्या आजारांचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
हिवाळा आनंददायी असतो. आल्हाददायी वातावरण पाहून नक्कीच सर्वांना चांगलं वाटतं; पण त्याचे धोकेही काही कमी नाहीत. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर तापमानात घट होताच शरीरात अनेक बदल सुरू होतात. कारण आपले शरीर एका ठराविक तापमानात संतुलित राहते. जसजसे तापमान कमी होऊ लागते तसतसे शरीर आवश्यक अवयवांचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी आपत्कालीन प्रतिसाद दल सक्रिय करते. त्यातून हृदयविकाराचा धोका सुरू होतो असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.
नेमकी काय काळजी घ्याल ?
थंडीच्या दिवसांत उत्तम आरोग्यासाठी ब्रेकफास्ट म्हणजेच नाष्टा करणे महत्त्वाचे आहे. नाष्ट्यामध्ये मांस आणि दुग्धजन्य पदार्थाच्या जागी धान्य, बीन्स, नट, ऑलिव्ह ऑइल, फळे आणि भाज्या यांसारखे वनस्पती आधारित पदार्थ खाल्ले तर हृदयरोग आणि टाईप २ मधुमेह लक्षणीयरीत्या कमी केला जाऊ शकतो, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.
शेतकऱ्यांनी थंडीमध्ये रात्री शेताला पाणी देणे टाळा. उबदार कपडे घाला. कानामधून हवा जाऊ नये म्हणून कानात कापूस ठेवू शकता. सकाळी उन्हामध्ये बसता येईल अशा ठिकाणी बसा. शेतातील कामे ऊन पडल्यावर सुरु करा. तशी काही लक्षणे जाणवली अथवा अस्वस्थ वाटू लागले तर लगेच डॉक्टरकडे जा.
सकाळी थंडी, दुपारी ऊन तर रात्री गारवा
वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. सकाळी थंडी, दुपारी कडक ऊन, तर रात्री गारवा जाणवत आहे. हवेतील सापेक्ष आर्द्रता ५० टक्के एवढी नोंदली आहे. वाढत्या थंडीमुळे लोक उशिरा घराबाहेर पडत आहेत, रात्री बहुतांश रस्ते सामसूम दिसून येत आहेत.
अटॅकचे प्रमाण २५ टक्क्यांनी वाढते
थंड हवामानामुळे हृदयावर अधिक ताण पडतो, रक्तवाहिन्या अकुंचित होतात आणि शरीराभोवती रक्त्त परिसंचरण कमी होते. यामुळे हृदयातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ शकते आणि हृदयाला ऑक्सिजन आणि रक्त्त पंप करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. म्हणूनच थंड हवामानात हृदयाची स्थिती खराब होते, ज्यामुळे मृत्यु होऊ शकतो.