जळगाव : शेतात जात असताना रेल्वे बोगद्यात साचलेल्या पाण्यातून बैलांची सुटका करत असताना सुकलाल लालचंद माळी (६३, रा. आसोदा, ता. जळगाव) या शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना मंगळवार, ११ जून रोजी सकाळी १० वाजता आसोदा ते मन्यारखेडा रस्त्यावर घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
तालुक्यातील आसोदा येथील सुकलाल माळी हे मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास बैलगाडीने मन्यारखेडा रस्त्यावरील शेतात जात होते. सोमवारी मध्यरात्री जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने या रस्त्यावरील बोगद्यात पाणी साचले होते. त्यावेळी बोगद्याखालून पलीकडे जाण्यासाठी माळी यांनी बैलगाडी टाकली. त्यात त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने बैलगाडीसह सुकलाल माळी हे पाण्यात बुडाले. त्यावेळी त्यांनी दोन्ही बैलांची सुटका करण्यासाठी बैलगाडीची जोत तोडली. त्याचवेळी भेदरलेल्या बैलांनी झटका देत ते बाहेर आले. मात्र सुकलाल माळी यांना पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.
ही घटना शेजारी शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांच्या लक्षात आल्याने त्यांनी धाव घेत त्यांना खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. या घटनेमुळे आसोदा गावात शोककळा पसरली आहे.