Join us

Farmer Success : लढले, दिल्लीपर्यंत गेले अन् शेतकऱ्यांनी २२४ कोटींचा हक्काचा पिकविमा मिळवला!

By दत्ता लवांडे | Published: October 08, 2024 5:42 PM

२०२१ सालच्या खरिप हंगामातील पिकविम्याची भरपाई देण्यास विमा कंपनीने नकार दिला होता पण शेतकऱ्यांनी कंपनीच्या विरोधात लढून आपल्या हक्काचे पैसे मिळवले आहेत.

Crop Insurance : पिकविम्यासंदर्भात अनेक तक्रारी खरिप आणि रब्बी हंगामात येत असतात. पण विमा भरपाई न देणाऱ्या कंपनीविरोधात लढून परभणी येथील शेतकऱ्यांनी आपल्या हक्काचे तब्बल २२४ कोटी रूपये मिळवले आहेत. जिल्हा स्तरावरून थेट दिल्लीपर्यंत लढा देत पिकविमा कंपनीला चांगलाच धडा शिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी आज या संघर्षात मदत केलेल्या कृषी संचालक विनयकुमार आवटे यांची भेट घेतली. 

पिकविमा हा शेतकऱ्यांच्या पिकांच्या वाढीच्या आणि लागवडीच्या वेगवेगळ्या अवस्थेत झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून दिला जातो. तर अनेकदा शेतकऱ्यांकडून पिकविमा न मिळणे, अर्ज भरण्यासाठी अडचणी येणे, तक्रारी करूनही पीकविमा न मिळणे, परिसरातील कुणालाच विमा भरपाई न मिळणे अशा तक्रारी येत असतात.  

परभणी जिल्ह्यातील २०२१ सालच्या खरिप हंगामातील पिकविम्याचे आपल्या हक्काचे २२४ कोटी रूपये शेतकऱ्यांनी विमा कंपनी विरोधात संघर्ष करून मिळवले आहेत. यासाठी त्यांना दिल्लीतील पिकविमा कंपनीच्या सीईओपर्यंत लढा द्यावा लागला आहे. सुभाष कदम आणि शिवाजी दिवटे या शेतकऱ्यांनी ही लढाई नेटाने लढली आहे.

काय आहे प्रकरण?परभणी जिल्ह्यातील २०२१ सालातील खरिप सोयाबीन पिकाच्या विम्याचे काम रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे होते. त्यावेळी या कंपनीने वैयक्तिक तक्रारीचे पैसे देण्यासाठीसुद्धा टाळाटाळ केली होती. पण शेतकऱ्यांनी संघर्ष करून ३८० कोटी रूपये या कंपनीकडून मिळवले होते. पण उत्पादनावर आधारित विम्याचे २ लाख २० हजार शेतकऱ्यांचे २२४ कोटी या कंपनीने वेगवेगळे कारणे देऊन थकवले होते. 

त्यासंदर्भात वेगवेगळ्या स्तरावर सुनावण्या झाल्या. पहिली सुनावणी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, तिथे शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागला. दुसरी सुनावणी कृषी सचिवांच्या पातळीवर झाली, तिथेही शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागला. त्यानंतर या कंपनीने पंतप्रधान पीक विमा योजनेच्या सीईओ यांच्याकडे अपील केले. पण यादरम्यान विमा कंपनीने बराच गोंधळ घातला. पण २०२१ सालच्या पिकविम्यासंदर्भातील निकाल ३० सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या बाजूने लागला आणि विमा कंपनीला २२४ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे आदेश पीक विमा कार्यालयाने दिले आहेत.

आयुक्त आणि संचालकांची भेटपीक विम्याचे २२४ कोटी रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाल्यानंतर परभणी येथील सुभाष कदम, शिवाजी दिवटे आणि इतर शेतकरी कृषी आयुक्त रविंद्र बिनवडे आणि विस्तार व प्रशिक्षण संचालक विनयकुमार आवटे यांच्या भेटीला आले होते. या संघर्षात त्यांची मोठी मदत झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. 

आम्ही सर्व शेतकऱ्यांनी मिळून विमा कंपनीविरोधात संघर्ष करून २२४ कोटी रूपये मिळवले, यामध्ये आम्हाला दिल्लीपर्यंत जावे लागले. या सर्व प्रवासात कृषी संचालक विनयकुमार आवटे यांची मोठी मदत झाली त्यामुळे आम्ही त्यांचे आभार मानण्यासाठी परभणीवरून पुण्यात आलो आहोत.- डॉ. सुभाष कदम (२०२१ सालचा पिकविमा मिळवलेले शेतकरी, परभणी) 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपरभणी जिल्हा परिषद