Join us

संत्र्यातून शेतकरी मालामाल; राज्याच्या 'या' भागातून परजिल्ह्यांमध्ये केली जाते निर्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 1:49 PM

गेल्या काही वर्षांत प्रामुख्याने सीताफळ आणि संत्रा या फळपिकाच्या माध्यमातून शेतकरी अपेक्षित आर्थिक उन्नती साधत आहेत. जिल्ह्यातील संत्रा बेंगलोर, हैदराबाद, दिल्ली, सुरत आदी ठिकाणी निर्यात केला जात असून, आसपासच्या जिल्ह्यांमध्येही वाशिमचा संत्रा विक्री केला जात आहे.

वाशिम जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत प्रामुख्याने सीताफळ आणि संत्रा या फळपिकाच्या माध्यमातून शेतकरी अपेक्षित आर्थिक उन्नती साधत आहेत. जिल्ह्यातील संत्रा बेंगलोर, हैदराबाद, दिल्ली, सुरत आदी ठिकाणी निर्यात केला जात असून, आसपासच्या जिल्ह्यांमध्येही वाशिमचा संत्रा विक्री केला जात आहे.

जिल्ह्यात सुमारे ४ लाख हेक्टर जमिनीचे क्षेत्र वहितीखाली आहे. मात्र, सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध नसल्याने रबी हंगामात ३० ते ३५ टक्के; तर खरिपात ७० ते ८० टक्क्यांवर पारंपरिक पिकांची पेरणी केली जाते. त्यालाही विविध नैसर्गिक संकटांचा फटका बसत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

दरम्यान, ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची चांगली सुविधा आहे, त्यांनी संत्रा आणि सिताफळ लागवडीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. संत्र्याचे लागवड क्षेत्र अधिक असून, माल परजिल्ह्यांमध्ये निर्यात केला जात आहे.

जिल्ह्यातील विविध ठिकाणी सिताफळ आणि संत्रा लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. संत्र्याची परजिल्ह्यांमध्ये निर्यात करून अधिक नफा मिळत असल्याने शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. - आरीफ शाह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

हजारो कॅरेट संत्र्याची होतेय निर्यात

'ग्रेडिंग'द्वारे चांगल्या दर्जाचा संत्रा कॅरेटमध्ये भरून त्याची निर्यात केली जात आहे. दरवर्षी असा हजारो कॅरेट संत्रा परजिल्ह्यात विक्रीला जात असल्याचे दिसत आहे.

केळी लागवडीचे क्षेत्र किती? (हेक्टरमध्ये)

तालुकाक्षेत्र
वाशिम२००
मालेगाव५००
रिसोड३००
मंगरूळपीर४००
कारंजा२५०
मानोरा१५०

या पाच महानगरांमध्ये केली जाते निर्यात

वाशिम जिल्ह्यात उत्पादित संत्र्याची हैद्राबाद, बेंगलोर, दिल्ली, सुरत, मुंबई या पाच महानगरांमध्ये निर्यात केली जात आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे.

केळी उत्पादक म्हणतात....

वनोजा परिसरात संत्र्याच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. परजिल्ह्यात अधिक दर मिळत असल्याने मालाची निर्यात केली जात आहे. - संजय राऊत, शेतकरी.

संत्रा या पिकाचे सुयोग्य नियोजन केल्यास अपेक्षित उत्पादन घेता येणे सहज शक्य होते. आर्थिक उन्नती साधण्यासाठी हे पीक फायदेशीर आहे. - विष्णूपंत राऊत, शेतकरी.

टॅग्स :विदर्भवाशिमफळेफलोत्पादनशेतकरीशेतीशेती क्षेत्रबाजार