शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अॅग्रीस्टॅक योजनेत अहिल्यानगर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आला असून आतापर्यंत जिल्ह्यात ५ लाख १८ हजार ५८१ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे.
केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांमधील गोंधळ कमी करण्यासाठी अॅग्रीस्टॅक योजना सुरू करण्यात आलेली आहे.
जिल्हा प्रशासनाला १५ लाख २२ हजार ५८१ शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत ५ लाख १८ हजार ५८१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
जिल्ह्यात ५ लाख ७३ हजार ९९० पीएम किसानचे लाभार्थी आहेत. यातील ९०.३५ टक्के शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार करण्यात आले आहे.
शासकीय योजनांचा लाभमिळण्यासाठी 'अॅग्रीस्टॅक' या योजनेत नावनोंदणी करणे शेतकऱ्यांना अनिवार्य आहे. शेतकऱ्यांनी जवळच्या सीएससी सेंटरमध्ये फार्मर आयडीसाठी अर्ज करावेत.
नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात येत आहेत. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. शेतकऱ्यांकडून पैशाची मागणी केल्यास कारवाई करण्यात येणार आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी, पीक विमा, कृषी विभाग यांत्रिकीकरण, थेट लाभहस्तांतरण, पीक कर्ज मिळवण्यासाठी ओळखपत्राचा उपयोग होणार आहे.
फार्मर आयडीसाठी आवश्यक कागदपत्रे
फार्मर आयडीसाठी आधार कार्ड, सात बारा उतारा गट क्रमांक, नमुना ८ अ खाते उतारा क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि लाभार्थी शेतकरी नोंदणीवेळी उपस्थित असणे आवश्यक आहे.
तालुकानिहाय नोंदणी
तालुका - नोंदणी
श्रीगोंदा ४४,६८५
नगर ३४,९२२
संगमनेर ५१,६६१
जामखेड २६,७११
कर्जत ३८,१०२
पाथर्डी ३८,९१८
राहुरी ३८,८५८
नेवासा ५३,०८६
शेवगाव ३८,८४८
कोपरगाव २६,७८६
पारनेर ४४,८९५
अकोले ३२,३७३
राहाता २६,०२९
श्रीरामपूर २२,७०७
अधिक वाचा: Farmer id : फार्मर आयडी नंबर मिळायला सुरवात; कसे चेक कराल तुमच्या आयडीचे स्टेटस? वाचा सविस्तर