Pune Farmer Jugad : आपल्याकडे टॅलेंटला कमी नाही, प्रत्येक माणसाकडे काही ना काही कला असते असं आपण अनेकदा म्हणतो. पण काहीजण आपल्याकडे असलेल्या कलेला, टॅलेंटला प्रत्यक्षात उतरवत असतात. असाच एक प्रगोग पुणे जिल्ह्यातील वेळू येथील शेतकरी गुलाब घुले यांनी केला आहे. त्यांनी घरच्या घरी टाकाऊ वस्तूंपासून सापळा बनवला आहे.
पालेभाज्या, फळपीक आणि इतर पिकांवरील कीड रोगांपासून संरक्षण मिळावे यासाठी चिकट सापळे, सोलर सापळे आणि कामगंध सापळ्यांचा वापर केला जातो. कामगंध सापळ्यांच्या माध्यमातून किडींना आकर्षित केले जाते आणि त्यानंतर त्यांना ट्रॅप केले जाते म्हणजेच अडकवले जाते. सापळ्यात अडकलेल्या किडींचा अडकून मृत्यू होतो. सापळ्यांच्या मदतीने शेतातील कीड रोगांवर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळवता येते.
कसा बनवला सापळा?गुलाब घुले यांनी घरच्या घरी पाण्याची बाटली, तार आणि कामगंध वडीपासून सापळा बनवला आहे. पाण्याच्या बाटलीला दोन्ही बाजूने दोन छिद्र पाडले. बाटलीच्या झाकणाला छिद्र पाडत त्यातून तार खाली ओढली. छिद्राच्या बरोबरीने बाजारात मिळणाऱ्या फ्रुट फ्लाय या कामगंध वडी अडकवली. आणि झाकणातून बाहेर आलेली तार झाडाला बांधून ठेवली. अशा पद्धतीने सापळा तयार केला आहे.
बाजारात मिळणाऱ्या सापळ्यांच्या तुलनेत हा सापळासुद्धा सारखेच काम करतो आणि या सापळ्याच्या वापरातूनही आपण किडींवर नियंत्रण मिळवू शकतो असा अनुभव घुले यांना आला आहे. यामुळे बाजारात मिळणाऱ्या सापळ्यांवर ६० ते ८० रूपयांपर्यंत खर्च करण्याची गरज नाही. घरच्या घरी केवळ १५ रूपयांना मिळणाऱ्या कामगंध वडीचा वापर करून आपण सापळा बनवू शकतो असा सल्ला घुले यांनी दिला आहे.