मृदसंधारण क्षेत्रातील पहिली शेतकरी उत्पादक कंपनी गुजरात मधील बनासकांठा येथे स्थापन करण्यात आली आहे. आज (३ सप्टेंबर ) रोजी सद्गुरुंच्या वाढदिवसानिमित्त या कंपनीचे उद्घाटन करण्यात आले.
माती वाचवण्यासाठी सद्गुरुंच्या जागतिक चळवळीने प्रेरित होऊन, या एफपीसीमध्ये एक प्रगत माती परीक्षण प्रयोगशाळा आणि जैव खत प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे.
या प्रयोगशाळेत जैविक चाचण्या, सूक्ष्मजीव जीवन आणि माती आरोग्याची माहिती देणारा "माती जीवन अहवाल" मिळणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची मात्रा आणि गुणवत्ता या दोन्हीसाठी अनुकूल खतांच्या निवड करता येईल.
रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा ऱ्हास होण्याची चिंताजनक परिस्थिती आहे. मातीच्या आरोग्याचे अचूक मूल्यांकन न करता, शेतकरी मातीच्या आरोग्यासाठी आवश्यक पोषक तत्वांचा वापर करण्यात अयशस्वी ठरतो आहे.
त्यामुळे अनावश्यक रसायनांचा वापर हा दिवसें दिवस वाढताना दिसत आहे. हीच तफावत दूर करण्यासाठीचा एक भाग म्हणून अत्याधुनिक माती परीक्षण प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. दरम्यान, या एफपीसीसाठी सेव्ह सॉईल बनास टीमने थरद आणि लाखनी तालुक्यातील ४० गावांतील १४ हजार ४९२ शेतकऱ्यांना सहभागी करून घेतले आहे.
प्रवीणा श्रीधर, मुख्य तांत्रिक अधिकारी यांनी सांगितले की, मातीची स्थिती लक्षात घेऊन त्यांचे व्यवस्थापन कसे करायचे हे एफपीसीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगितले जाईल. माती आपल्या जीवनाचा स्त्रोत असून उच्च दर्जाच्या मातीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.
दरम्यान एफपीसी (बनास डेअरी आणि सेव्ह सॉईल मूव्हमेंट यांनी संयुक्तपणे आयोजित) कार्यक्रमात प्रमुख पाहुणे असलेले गुजरात विधानसभेचे अध्यक्ष आणि बनास डेअरीचे अध्यक्ष शंकरभाई चौधरी, यांनी सांगितले की, “बनास डेअरीमध्ये आज फक्त एक दिवस नाही. तर तो शेतकऱ्यांसाठी एक सुवर्ण क्षण आहे. बनास सेव्ह सॉईल फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि आमच्या थरड आणि खिमाणा येथे नवीन सुविधांसह शाश्वत भविष्याचा पाया रचतील.
दरम्यान मागील १ वर्ष आणि ४ महिन्यांहून अधिक काळ, सेव्ह सॉइल टीमने बनास डेअरी एफपीसी टीमसोबत भागीदारीत हजारो शेतकऱ्यांसाठी ''माती वाचवा'' या मोहिमेव्दारे एफपीसीमध्ये शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी अनेक कार्यशाळा घेतल्या.
थरड आणि लाखनी सारख्या कोरडवाहू प्रदेशात शेतकऱ्यांसाठी मातीची गुणवत्ता, खालावणारी भूजल पातळी आणि अत्यंत हवामानाची परिस्थिती यांसह अनेक आव्हानांचा अभ्यास करण्यात आला.