रऊफ शेख / फुलंब्री :
लाडकी बहीण योजनेंतर्गत राज्य शासनाने महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये देण्यास सुरुवात केली असली तरी फुलंब्री तालुक्यातील ३ हजार ८४३ शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत गेल्या वर्षभरापासून अनुदानाचे १५ कोटी रुपये दिले नसल्याने लाडके शेतकरी योजना कधी सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
केंद्र सरकारची प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व राज्याची मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना या दोन योजना एकत्र मिळून राज्यात सूक्ष्म सिंचन योजना राबविण्यात येते. यात केंद्र सरकार ५५ टक्के, तर राज्य सरकारकडून २५ टक्के असे एकूण ८० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना ठिबक दिले जाते.
फुलंब्री तालुक्यातील ३ हजार ८४३ शेतकऱ्यांना २०२३ ते २०२४ या वर्षात या योजनेंतर्गत ठिबक देण्यात आले; पण या योजनेचे १५ कोटी रुपयांचे अनुदान अद्यापही या शेतकऱ्यांना देण्यात आलेले नाही.
शेतकऱ्यांना अनुदानाची ८० टक्के रक्कम शासन देणार असल्याने संबधित दुकानदारांनी उधारीवर ठिबक दिले. आता वर्षभरापासून शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळत नसल्याने या दुकानदारांचा शेतकऱ्यांमागे वसुलीसाठी ससेमिरा लागला आहे.
त्यामुळे शेतकरी अनुदानाच्या रकमेसाठी कृषी कार्यालयात चकरा मारत आहेत; परंतु कृषी विभागातील कर्मचारी अनुदान आले नाही, असे सांगून परत पाठवीत आहेत.
याबाबत तालुका कृषी अधिकारी भारत कासार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत एक वर्षापासून शेतकऱ्यांच्या अनुदानाचे १५ कोटी रुपये अद्याप मिळाले नाहीत. यासंदर्भात वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू आहे, असे कासार म्हणाले.
इतर योजनांचे ६५ कोटी रुपये थकले
फुलंब्री तालुक्यात पंचायत समितीच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचे साडेपाच कोटी, कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांचे १५ कोटी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरु असलेल्या रस्ते, इमारत बांधकाम, पुल निर्माणचे जवळपास ४५ कोटी रुपये शासनाकडे थकले आहेत, असे असताना शासनाकडून चालू योजनांसाठी निधी न देता नव्या योजनांसाठी निधी दिला जात आहे. त्यामुळे मागील योजना बंद केल्या, असे तरी शासनाने जाहीर करावे, असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.
सिंचन साहित्याची विक्री मंदावली
शासनाचे अनुदान मिळेल, म्हणून संबंधित दुकानदार शेतकऱ्यांना उधारीवर सिंचनाचे साहित्य देत होते. आता वेळेवर अनुदान मिळत नसल्याने त्यांनी उधारी बंद केल्याने या साहित्याची खरेदी मंदावली आहे. याचा तालुक्यातील सिंचनाच्या क्षेत्रावरही परिणाम झाला आहे.