Lokmat Agro >शेतशिवार > कापूस लागवडीच्या नवे तंत्र शिकण्याकडे शेतकऱ्यांचा कल

कापूस लागवडीच्या नवे तंत्र शिकण्याकडे शेतकऱ्यांचा कल

Farmer scientist forum program and Dada Lad cotton cultivation technology workshop concluded | कापूस लागवडीच्या नवे तंत्र शिकण्याकडे शेतकऱ्यांचा कल

कापूस लागवडीच्या नवे तंत्र शिकण्याकडे शेतकऱ्यांचा कल

कापूस पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची प्रगती व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कापूस पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची प्रगती व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

शेअर :

Join us
Join usNext

कापूस पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची प्रगती व्हावी आणि रोगांपासून कापसाचे संरक्षण करून, नव्या पद्धतीचा अवलंब करून जास्तीत जास्त उत्पन्न शेतकऱ्यांनी कसे काढावे यासंदर्भात ९४ व शेतकरी शास्त्रज्ञ मंच कार्यक्रम व दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञान कार्यशाळा कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने ०१ जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आली होती.  

या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून छत्रपती संभाजीनगरचे विभागीय कृषि सहसंचालक मा.डॉ.तुकाराम मोटे, तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मा.प्रकाश देशमुख, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरचे कृषि विकास अधिकारी मा.प्रकाश पाटील, कृषि पणन महासंघ, छत्रपती संभाजीनगरचे मा.अनिल ठोसरे व प्रमुख मार्गदर्शक म्हणून कापूस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ मा.डॉ.अरविंद पांडागळे, विभागीय कृषि विस्तार केंद्र, छत्रपती संभाजीनगरचे मा.रामेश्वर ठोंबरे, प्रगतशील शेतकरी मा.दीपक जोशी, लोकमतचे प्रतिनिधी मा.श्री.केशव पवार, केव्हीकेचे कार्यक्रम समन्वयक डॉ.किशोर झाडे, विषय विशेषज्ञ डॉ.बस्वराज पिसुरे, डॉ.अनिता जिंतूरकर, डॉ.संजूला भावर, प्रा.अशोक निर्वळ, सतीश कदम, तसेच कापूस लागवडीसाठी दादा लाड तंत्रज्ञानाचा अवलंब करणारे जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी यांची उपस्थिती होती.

यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ.मोटे म्हणाले कि, शेतकऱ्यांनी भविष्यातील शेतीची गरज लक्षात घेऊन विविध तंत्रज्ञानाचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये सर्वप्रथम मातीच्या आरोग्याकडे सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे. मातीमध्ये असणाऱ्या सुक्ष्मजीवांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. यामुळे आपल्या जमिनीचा सेंद्रीय कर्ब वाढण्यास मदत होणार आहे. आणि सेंद्रीय कर्ब वाढला तर लागवड खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होणार आहे. त्यासाठी विना नांगरणी तंत्रज्ञान, आच्छादनाचा वापर, बेडवर लागवड, पिकांचे अवशेष जमीनीतच कुजवणे, विविध सेंद्रिय घटकांचा कीड व रोग नियंत्रणासाठी वापर, जैविक खते व बुरशीनाशकांचा नियमित वापर, इत्यादी बाबींचा अवलंब सर्व शेतकऱ्यांना करावाच लागेल. सेंद्रिय शेतीकडे वळणे ही काळाची गरज आहे परंतु यासाठी शेतकऱ्यांनी सर्व घटकांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. रासायनिक शेती पेक्षा सेंद्रिय शेती करण्यासाठी जास्त अभ्यासाची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यासाठी विविध प्रक्षेत्रे भेटी, प्रशिक्षण व प्रत्यक्ष अनुभव घेऊन अत्यंत अभ्यासपूर्ण शेती करणे गरजेचे आहे. यावेळी त्यांनी १० ड्रम पद्धत बद्दल सविस्तर माहिती दिली व याबद्दलचे प्रशिक्षण नारायणगाव येथे देण्यात येते व हे प्रशिक्षण शेतकऱ्यांनी घ्यावे असेही त्यांनी सांगितले.


"कापूस पिकामध्ये फवारणी व खतांवर अमाप खर्च करत आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च कमी करण्याची गरज आहे आणि यासाठी एकात्मिक पीक पद्धतीचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा. दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञानामध्ये योग्य वाणाची निवड, बेडवर लागवड, योग्य अंतर आणि संतुलित व गरज लागेल तेंव्हाच खतांचा वापर करणे या बाबी शेतकऱ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजेत. गळ फांदी काढणे व शेंडा खुडणे ही महत्त्वाची कामे आहेत. तसेच कापसाची लागवड ही ९० × ३० सेंटिमीटर या अंतरावर करावी. या पद्धतीने झाडांची एकरी संख्या वाढून उत्पन्न वाढते. यामध्ये शेतकरी कापसाची लागवड ९०×३० वर लागवड, ३०-३५ दिवसांनी गळ फांदी छाटने व ७० ते ७५ दिवसांनी किंवा झाडांची उंची साडेतीन ते चार फूट झाल्यास शेंडा खुडणे आवश्यक आहे. तसेच सर्व शेतकऱ्यांनी बेडचा व ठिबक सिंचन पद्धतीचा वापर प्रभावीपणे करणे गरजेचे आहे. आणि अन्नद्रव्य, कीड व रोग व्यवस्थापनासाठी एकात्मिक एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा. ज्यामध्ये निळे व पिवळे चिकट सापळे लावणे, कामगंध सापळे लावणे, निंबोळी अर्काचा नियमितपणे वापर करणे, जैविक बुरशीनाशकांचा वापर करणे, इत्यादी पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. तसेच सद्य परिस्थितीमध्ये सर्व शेतकऱ्यांनी कापसाची फरदड न घेता कापसाच्या पऱ्हाटी कुट्टी करून ती जमिनीमध्ये कुजवावी. जेणेकरून जमिनीला मोठ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय खत उपलब्ध होते व जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते तसेच जमिनीचा सेंद्रिय कर्ब देखील वाढतो. सध्या कापूस पिकांच्या सुधारित वाणांमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत तसेच कापूस संशोधन केंद्राद्वारे देखील संकरित कापूस, देशी कापूस, संकरित सरळ वाणे इत्यादींवर सखोल अभ्यास होत असून अनेक चांगले वाण उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तरी याबद्दलच्या सविस्तर माहितीसाठी शेतकऱ्यांनी केव्हीके तसेच कापूस संशोधन केंद्रास संपर्क करावा." असं डॉ.पांडागळे म्हणाले.

यावेळी मार्गदर्शन करताना श्री. देशमुख म्हणाले की, "शेतकऱ्यांनी सुरुवाती पासूनच एकात्मिक लागवड पद्धतीचा अवलंब करावा. कापसाची लागवड करत असताना कोणत्याही एकाच वाणाबद्दल आग्रही राहू नये. मार्केट मधील सर्वच संकरित वाणे हे तुल्यबळ असतात परंतु शेतकरी पिकाचे सुरुवातीपासून कसे नियोजन करतात यावर उत्पादन अवलंबून असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अभ्यासपूर्ण शिफारशी व तंत्रज्ञानाचा अवलंब आपल्या शेतीमध्ये करावा." यावेळी पाटील म्हणाले की, अशा पद्धतींचे प्रात्यक्षिके जिल्ह्यामध्ये राबविण्याबद्दल प्रयत्न करण्यात येतील. यावेळी ठोसरे यांनी, कापसाला जास्त बाजारभाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणती काळजी घेणे गरजेचे आहे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तर ठोंबरे यांनी शेतकऱ्यांनी आंतरपीक पद्धतींचा अवलंब करावा असे सांगितले तसेच पीक पद्धतीमध्ये कोणत्याही एकाच पिकावर अवलंबून न राहता आंतरपीक पद्धतीद्वारे किंवा निखोळी पद्धतीने एकापेक्षा जास्त पिकांची लागवड करावी असे सांगितले.

यावेळी दीपक जोशी, समाधान पाटील, पंढरीनाथ काचोळे या प्रगतशील शेतकऱ्यांनी आपले अनुभव कथन करून उपयुक्त मार्गदर्शन केले. यावेळी प्रगतशील शेतकरी सदाशिव गीते यांचा मिलिनीयर फार्मर ऑफ इंडिया हा पुरस्कार मिळल्याबाबद्दल व दीपक जोशी यांना शेतकरी राजा हा पुरस्कार मिळाला बद्दल केव्हीके द्वारे सत्कार करण्यात आला. तसेच दादा लाड तंत्रज्ञान द्वारे कापूस लागवड करणाऱ्या एकूण २२ शेतकऱ्यांचा देखील केव्हीकेद्वारे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

डॉ.झाडे यांनी प्रस्तावना करताना सांगितले की, कापूस पिकामध्ये दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञान चा अवलंब व त्याचा शेतकऱ्यांचा अनुभव यासाठी सदर प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राबवण्यात येत असून बरेच शेतकरी या तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहेत. याच्या तांत्रीक बाबींवर सविस्तर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यासाठी केव्हीके द्वारे जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.बस्वराज पिसुरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.अनिता जिंतूरकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.संजूला भावर, अशोक निर्वळ, सतीश कदम यांनी नियोजन केले.

Web Title: Farmer scientist forum program and Dada Lad cotton cultivation technology workshop concluded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.