Join us

शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2023 8:05 PM

शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम संपन्न

पैठण  : शेतकरी आणि शेतीच्या प्रश्नावर अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांचा सुसंवाद कार्यक्रम आज पार पडला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, येथे आज (ता.०१) ९३ वा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम घेण्यात आला होता. प्रत्येक महिन्याच्या ०१ तारखेला हा कार्यक्रम केव्हीके मार्फत घेण्यात येतो. या कार्यक्रमात डॉ.अनिता जिंतूरकर, प्रा.गीता यादव, डॉ.संजूला भावर, डॉ.बस्वराज पिसुरे यांनी उपस्थितांना विविध विषयावर मार्गदर्शन केले. भारतात एकूण कृषी मालापैकी केवळ २ टक्के मालाची प्रक्रिया होते. त्यामुळे शेतकरी आणि विशेष करून ग्रामीण युवक व विद्यार्थी यांना कृषिमाल प्रक्रिया उद्योगामध्ये खूप संधी आहेत. तरी त्यांनी याकडे वळावे असं मत प्रा.यादव यांनी व्यक्त केले.

'दुध प्रक्रिया उद्योगाला खूप महत्व आहे. जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी स्वतःचे डेअरी युनिट सुरु करून आपला चांगला व्यवसाय उभा केला आहे. ग्रामीण महिलांनी याकडे वळावे' असं डॉ.जिंतूरकर म्हणल्या. त्याचबरोबर सद्य परिस्थती मध्ये मोसंबीतील बहार व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. पाऊस पडल्यामुळे यापुढे संतुलित व शिफारशीत अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी प्रत्येक झाडाला ६०० ग्रॅम नत्र + ४०० ग्रॅम स्फुरद + ४०० पालाश, ०७ किलो निंबोळी पेंड, ४० ते ५० किलो शेणखत, १०० ग्रॅम स्फूरद विरघळणारे जिवाणु, १०० ग्रॅम ॲझोस्पिरीलम द्यावेत. तसेच ज्या बागा ह्या ३० ते ३५ टक्के पर्यंत ताणावर होत्या त्यांनी पाऊस झाल्यामुळे ताण तुटला असे समजून नियमित अन्नद्रव्य व्यवस्थापन करून बहार व्यवस्थापन करावे तर ज्या बागा ताणावर आलेल्या नाहीत त्यांनी बाग ताणावर ठेवण्यासाठी  ०२ मिली क्‍लोरमेक्वाट क्‍लोराईड (लिहोसीन) या कायिक वाढ रोखणाऱ्या संजीवकाची प्रतिलिटर पाण्यात मिसळून हलक्या जमिनीतील बागेसाठी ०१ फवारणी तर भारी जमिनीतील बागेसाठी १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी घ्यावी व बागेत हलकी झाडाच्या मुळ्या तुटणार नाही याची खबरदारी घेऊन हलकी मशागत करावी. असं डॉ.भावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले.

यावेळी डॉ.बस्वराज पिसुरे यांनीही शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना व प्रक्रिया उद्योगासाठी शासनाच्या विविध योजना याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी कृषि महाविद्यालय खंडाळा येथील सहायक प्राध्यापक डॉ.एस.एल.चोपडे, प्रा.व्ही एस.चव्हाण, कृषि महाविद्यालय गेवराई तांडा येथील सहायक प्राध्यापक प्रा.सीमा चाटे यांचीही उपस्थिती होती. यावेळी शेतकरी व विद्यार्थी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीविज्ञान