नांदेड : सोमवार (दि.१०) रोजी संस्कृति संवर्धन मंडळ संचालित कृषि विज्ञान केंद्र सगरोळी द्वारे ५ वा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम मांजरम (ता. नायगाव) येथे उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. प्रवीण चव्हाण यांच्या प्रास्ताविकाने झाली ज्यामध्ये त्यांनी या सुसंवादाचा उद्देश व त्याची रूपरेषा विशद केली. या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्यांवर उपाय शोधणे. शेतकऱ्यांनी कृषि विज्ञान केंद्राच्या विविध शास्त्रज्ञांना प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन केले.
या कार्यक्रमात प्रा. कपिल इंगळे, डॉ. संतोष चव्हाण, डॉ. कृष्णा अंभुरे, डॉ. नीहाल मुल्ला आणि डॉ. प्रवीण चव्हाण यांनी प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून सहभाग घेतला. शेतकऱ्यांनी माती परीक्षणासाठी कॅम्प लावण्याची मागणी केली आणि कृषि विज्ञान केंद्राच्या विविध उपक्रमांबद्दल आपला उत्साह व्यक्त केला. भविष्यात अशाप्रकारचे संवाद अधिकाधिक आयोजित करण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनात बालाजी चंदापुरे व प्रभुदास उडतेवार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तर शेतकऱ्यांच्या सहभागाने आणि उस्फूर्त प्रतिसादाने कार्यक्रम अधिक रंगतदार बनला.