नितीन काळे
जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्यांकडे पाहिले जाते. पण, हा पोशिंदा पारंपरिक कोशात अडकत असल्याने आर्थिक गर्तेत सापडलाय. शेतीतील आव्हानांना सामोरे जाताना डगमगतोय.
यासाठी बळीराजाने शेतीकडे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून नव्हे तर व्यवसाय म्हणून पहावे. आधुनिक पद्धतीचा उपयोग करावा. पूरक व्यवसाय सुरू करावेत, तरच बळीराजाला आणखी सुबत्ता प्राप्त होऊ शकते.
भारत देश कृषिप्रधान आहे. आजही ६० टक्क्यांहून अधिक जनता शेतीवरच अवलंबून आहे. भारतात अजूनही कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास झालेला नाही. पाश्चात्त्य देशांत काही गुंठ्यांत लाखो रुपयांची उलाढाल करणारे शेतकरी आहेत.
पण, आपल्याकडे एक एकर क्षेत्रातही तेवढी उलाढाल होत नाही हेही वास्तव आहे. यामागे अनेक कारणे आहेत. तरीही शेतकऱ्यांनी आपला दृष्टिकोन बदलला तर बरेच काही होऊ शकते. यासाठी नवनवीन पद्धतीचा अवलंबून करून व्यापक दृष्टिकोनातून त्याकडे पाहणे आवश्यक आहे.
बाजारात जे चालणार अशा पिकांची, फळांची निवड करणे गरजेचे आहे. यासाठी बाजारपेठ शोधली पाहिजे. यातूनच नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळण्यास मदत होईल. तसेच उच्चदर्जाच्या फळांचे उत्पादन घेतले तर त्यासाठी जगाची बाजारपेठही खुली आहे.
यासाठी कृषी विभागाचा सल्ला आणि मार्गदर्शनही उपयोगी पडू शकते. शेतीत व्यवसायाची दृष्टी असेल तर शेतकरी पारंपरिक पीकपद्धतीत गुरफटून पडणारच नाही. त्याला नवनवीन पिके आणि फळांचे पर्याय मिळू शकतील.
तांत्रिक ज्ञान, कौशल्य आवश्यक
• पाण्याचा वापर कमी होऊन प्रगत सिंचन तंत्राचा वापर करुन पीक उत्पादनातही वाढ करता येते. या पध्दतीत तंत्रज्ञान आणि उपकरणांचा खर्च अधिक असल्याने यासाठी तांत्रिक ज्ञान आणि कौशल्य आवश्यक असते. यामुळे शेतकऱ्यांसाठी काही समस्या उद्भवू शकतात.
• यासाठी सुरुवातीला अभ्यास करून योग्य नियोजन केल्यास फायदाच होईल, तसेच राज्य आणि केंद्र शासनाच्याही शेतकऱ्यांसाठी विविध योजना आहेत. यातून फळबाग लागवड करता येते, शेतीपयोगी यंत्रे मिळवता येतात. या योजनाचा लाभही शेतकऱ्यांनी घ्यायला हवा. तरच शेती फायदेशीर होईल.
आधुनिक शेतीपद्धत ठरते फायदेशीर
• शेती ही श्रमप्रधान, वेळखाऊ आणि मनुष्यबळावर आधारित आहे. यातून कमी उत्पादन मिळते.
• पारंपरिक शेतीने पर्यावरणाची हानी होऊ शकते. नैसर्गिक
• संसाधने कमी होऊ शकतात. जमिनीची धूप होते. आधुनिक शेतीपद्धतीने जमिनीचे आरोग्य सुधारते.
शेतीवर आधारित व्यवसाय करा...
• शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच त्याला पूरक व्यवसाय करण्याची गरज आहे. यासाठी दुग्धोत्पादन करण्यासाठी गाय, म्हैस यांचा सांभाळ करावा. कुक्कुटपालनही शेतीबरोबर करता येते. शेतीतील उत्पादन अधिक होत असल्यास त्यासाठी विपणन व्यवस्था करावी.
• त्यामुळे व्यापाऱ्यांकडे शेतमाल पाठवून नुकसान सहन करण्यापेक्षा स्वतःच्या मार्केटिंग आणि विपणन व्यवस्था उभारावी. तसेच बांधावरून भांडून पोलिस ठाणे, न्यायालयात जाण्यापेक्षा शेतकऱ्यांनी गटशेती करावी. अनेक शेतकरी एकत्र आले तर सर्वच बाबतीत फायदा होऊ शकतो.
माती तपासणी हवी
• जवळपास बहुतांशी शेतकरी पारंपरिक पध्दतीनेच शेती करतात. कधीही मातीची तपासणी करत नाहीत. पण, माती तपासणीचे खूप फायदे आहेत. कारण, मातीच्या तपासणीनंतर जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते.
• त्यानुसार पिकांसाठी समतोल आणि योग्य प्रमाणात खताची मात्रा देऊन उत्पादनात वाढ करता येते. कोणते पीक घ्यावे, कोणती फळबाग लागवड करावी, याचेही ज्ञान मिळते. यासाठी माती परीक्षण खूप महत्त्वाचे आहे.