सध्या इतर रोगांच्या तुलनेत कर्करोग फोफावत चालला आहे. व्यसनाधीनता, अनियमित जीवनशैली, ताणतणाव, प्रदूषणाचा परिणाम म्हणून वाट्याला येणारा कॅन्सर हा सर्व स्तरातील स्त्री-पुरुषांसाठी जीवघेणा ठरत आहे. जागरूक राहून सुरुवातीच्या टप्प्यात जर निदान केले तर कर्करोग बरा होऊन सामान्य जीवन जगता येऊ शकते. जगभरात दरवर्षी ४ फेब्रुवारी हा दिवस 'जागतिक कर्करोग दिन' पाळला जातो. त्या अनुषंगाने आँकोसर्जन डॉ. राकेश नेवे यांच्याशी साधलेला हा संवाद.
कर्करोग म्हणजे काय? त्याचे किती प्रकार आहेत?शरीरातील नॉर्मल पेशींची अचानकपणे, असंघटितपणे होणारी वाढ म्हणजे कर्करोग होय, शरीराच्या ज्या-ज्या भागात कर्करोग होतो त्याप्रमाणे त्याचे वर्गीकरण केले जाते. कर्करोगाचे नवीन प्रकार नाहीत; पण जास्तीत जास्त नवीन निदान आल्याने त्यातले नीटनेटके वर्गीकरण आणि अधिक लवकर निदान होत असल्याने नवीन प्रकार आल्याचे वाटते, निदान करण्यासाठी नवीन पॅथॉलॉजीच्या टेस्ट व नवीन जनुकीय चाचण्या करून त्याच आजारांचे नीटनेटके वर्गीकरण होऊन त्यातले वेगवेगळे प्रकार असल्याचे दिसून येते.
कर्करोग वाढण्याची कारणे काय आहेत? कोणता घटक याला जास्त कारणीभूत ठरतो?कर्करोग वाढण्याचे कारण आहे व्यसन, त्यासोबतच आहारामध्ये मांसाहाराचा जास्त वापर, तंबाखू, व दारुरी सेकन हे आहे, धकाधकीचे जीवन, ताणतणाव, प्रदूषण अन्नधान्यामध्ये विविध कीटकनाशकांचा होणारा वापर ही महत्त्वाची कारणे आहेत.
कर्करोगावर काही नवीन औषधे, थेरपी आल्या आहेत का, असतील तर त्या कोणत्या?नवीन औषधे व नवीन थेरपी उपलब्ध आहेत. जरी केमोथेरपी जास्तीत जास्त प्रमाणात वापरली जात असली तरी आता आजारांचे नीटनेटके वर्गीकरण, अनुकीय चाचण्या होऊन टार्गेटेड बेरपी म्हणजे त्या-त्या कॅन्सर पेशींना मारेल आणि नॉर्मल पेशींना वाचवेल अशी टार्गेटेड थेरपी आली आहे. शरीराच्या प्रतिकारशक्तीचा वापर करून कॅन्सरवर मारा करण्यासाठी इम्युनोथेरपी हे नवीन औषधाचे प्रकार आले आहेत तसेच, रेडिओथेरपी उपचारातही अद्ययावत एसबीआरटी (स्टिरिओटॅक्टिक बॉडी रेडिएशन थेरपी), सायबर नाइफ थेरपी, प्रोटॉन वेरपी आली आहे, या नवनवीन उपचार पद्धती आल्याने कॅन्सर बरा होण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे.
यामध्ये मृत्युदराचे प्रमाण किती? आहे? तो कमी करण्यासाठी काय करायला हवे?यामध्ये मृत्यूचे प्रमाण एकलाख लोकसंख्येमागे साठ ते पासष्ट इतके आहे. गेल्यावर्षी नऊ ते साडेनऊ लाख मृत्यू झाले आहेत. दरवर्षी साधारण १२ लाख नवीन रुग्णांना कॅन्सरचे निदान होते. त्यापैकी साधारणपणे ५० टक्के मृत्यूचे प्रमाण आहे. मृत्यु कमी करण्यासाठी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे लवकर निदान करणे, लक्षणांविषयी माहिती करून घेणे. तशी लक्षणे असल्यास पटकन डॉक्टरांचा सल्ला घेणे व उपचार घेणे हे आहे.
अधिक वाचा: पोषणसमृध्द भरडधान्यांचे मानवी आरोग्यातील महत्व
कर्करोगाचे निदान उशिरा झाल्यामुळे मृत्युदर वाढतो हे खरे आहे का?उशिरा निदान झाल्याने कॅन्सर शेवटच्या टप्प्यात लक्षात येतो त्यावेळी कॅन्सर शरीरात इतरत्र पसरलेला असू शकतो, पसरलेला नसला तरी ऑपरेशन केल्यावर परत येण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे उशिरा निदान झाल्याने मृत्यूचे प्रमाण वाढते हे खरे आहे.
या आजाराचा धोका कोणाला असतो, तो कमी करण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी?तडाखू किंवा सिगारेटचे सेवन करणारे, दारूचे सेवन करणारे, अधिक प्रमाणात मांसाहार सेवन करणारे, पेस्टिसाइड, सिमेंट व अॅस्बेस्टॉसशी संपर्क जास्त असलेले यांच्यामध्ये कर्करोगाचे प्रमाण जास्त असते.
कर्करोग रोखण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय आहेत का? ते कोणते?नियमित व्यायाम, वजनावर नियंत्रण, स्त्रियांनी स्तनमान करणे, स्त्रियांना मुले तिशीच्या आत होणे, हिरव्या पालेभाज्यांचा नियमित वापर या गोष्टीचा कर्करोगाचा धोका कमी करण्यामध्ये समावेश होतो.
कर्करोगाबाबत सर्वसामान्यांना तुम्ही काय संदेश द्याल? लिव्हरचा कर्करोग जो हिपॅटायटिसच्या विषाणूंमुळे व गर्भाशय मुखाचा कर्करोग जो एचपीव्ही विषाणूंमुळे होतो, त्यास कर्करोग लसीकरणाने प्रतिबंध करता येतो, तसेच, तोंडाचा किंवा फुप्फुसांचा कर्करोग हा तंबाखूचे सेवन टाळून कमी करता येतो, कर्करोगाविषयी जागरूक राहा. त्याला घाबरून जाऊ नका, त्याविषयी काही लक्षणे असतील तर तपासणी करा, महिलांनी चाळिशीनंतर मॅमोग्राफी व पॅपस्मिअर वर्षातून एकदा करायला हवी. पुरुषांनी पन्नाशीनंतर प्रोस्टेट ग्रंथीसाठी पीएसए टेस्ट करावी, या खबरदारीमुळे कॅन्सरपासून बचावाची शक्यता वाढते.