Join us

शेतकऱ्यांची चिंता वाढली; शासकीय ज्वारी खरेदी केंद्र बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 11:32 AM

मे महिन्यात शासकीय हमीभावात शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी केंद्र येथे सुरू झाले होते. खरेदी केंद्राच्या गोदामात जागाच नसल्याने २१ दिवसांपासून ज्वारी खरेदी बंद आहे, तर ३१ जुलैला शासनाचे खरेदी केंद्र बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

अनंत वानखडे

अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात मे महिन्यात शासकीय हमीभावात शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी केंद्र बाळापूर येथे सुरू होते. खरेदी केंद्राच्या गोदामात जागाच नसल्याने २१ दिवसांपासून ज्वारी खरेदी बंद आहे, तर ३१ जुलैला शासनाचे खरेदी केंद्र बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

रब्बी हंगामातील ज्वारीला योग्य भाव मिळावा म्हणून ३१८० रुपये प्रति क्विंटल दराने ज्वारी खरेदी सुरू होती. यासाठी बाळापूर तालुक्यातील ज्वारी खरेदीचे ४२९५ क्विंटल उद्दिष्ट निर्धारित केले होते. ४२८० क्विंटल ज्वारी खरेदी करून केंद्र जूनमध्ये बंद केले.

१२४४ शेतकऱ्यांनी ज्वारी विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यातील केवळ ९६ शेतकऱ्यांनी ४२८० क्विंटल ज्वारी शासकीय ज्वारी खरेदी केंद्र येथे विकली.

गोदाम भाडेबाबत निर्णय नाही!

बाळापूर येथील ज्वारी खरेदी केंद्रातील गोदाम क्षमता नसल्याने नवीन खासगी गोदाम शोधण्यात १५ दिवस गेले. दोन दिवसांपूर्वी रिधोरा परिसरातील गोदाम घेण्याचे ठरले. परंतु, गोदाम भाडेबाबत अद्यापही निर्णय न झाल्याने ज्वारी खरेदी केंद्र सुरू होईल की नाही, याबाबत साशंकता आहेत.

बाळापूर तालुका खरेदी-विक्री संघ ही संस्था शेतकऱ्यांचे हित जोपासून शासनाचे खरेदी उद्दिष्ट व शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करण्याची जबाबदारी पार पाडते. त्यासाठी शेतकऱ्यांना शासन खरेदी केंद्रात मालविक्रीसाठी आणण्याची तारीख वेळ ठरवून तोलकाटा करून शेतकऱ्यांना मालाची पावती देण्याचे काम करते. गोदाम निश्चित झाल्यास शेतकऱ्यांना ज्वारी केंद्रावर आणण्याच्या सूचना करू. - विश्वनाथ थोटे, व्यवस्थापक, बाळापूर खरेदी-विक्री संघ.

बाळापूर येथे पूर्वी ४२८० क्विंटल ज्वारी खरेदी केली. शासकीय गोदामात जागा नसल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यामार्फत नव्याने आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी रिधोरा येथील खासगी गोदामात लवकरच ज्वारी खरेदी केंद्र सुरू करून शासनाचे खरेदी उद्दिष्ट पूर्ण होईल. - वैभव फरतारे, तहसीलदार, बाळापूर.

बाळापूर तालुक्याचे शासनाने वाढवून दिलेले उद्दिष्ट व खरेदी अंतिम तारीख ३१ जुलै आहे. आठ दिवसांत खरेदी उद्दिष्टपूर्ण होईल का, शेतकऱ्यांना बाळापूरऐवजी रिधोरा गोदाम गैरसोयीचे आहे. ११४८ नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची ज्वारी पूर्ण खरेदी करण्यात यावी.  - रामकृष्ण सोनटक्के, शेतकरी, देगाव.

बाळापूर येथे गोदाम नसल्याने गेल्या २० दिवसांपासून खरेदी-विक्री संघाकडे चकरा मारत आहे. शासकीय ज्वारीचे दर ३१८० रुपये आहे, तर बाजारपेठेत व्यापारी २००० रुपये प्रति क्विंटलने मागतात. अनेक शेतकरीशेती लागवडीसाठी लागणाऱ्या खर्चासाठी मातीमोल भावाने माल व्यापाऱ्यांना विकत आहे. - रामराव खोपडे, शेतकरी, पारस.

१२,८०० क्विंटल उद्दिष्ट वाढविले; पण...

शासनाने १२,८०० क्विंटलचे उद्दिष्ट वाढवून खरेदी केंद्र चालवण्याची परवानगी दिली. या पूर्वीच्या कंपनीने शेतकऱ्यांची केलेली नोंदणी अमान्य करून नवीन नोंदणी करण्यास सांगितले. मात्र, नोंदणी पोर्टल बंद आहे. यापूर्वी ११४८ नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण होईल की नाही, याबाबत शेतकरी खरेदी विक्री संघ सोसायटी येथे चकरा मारत आहे.

हेही वाचा -  Rain Alert तुम्हाला माहिती आहे का पावसाचा रेड, ऑरेंज, ग्रीन, यलो अलर्ट म्हणजे काय? मग हे वाचाचं

टॅग्स :शेती क्षेत्रज्वारीशेतकरीशेतीसरकारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीविदर्भ