Join us

किसान प्रदर्शनात शेतीतील नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान, प्रयोगांचे शेतकऱ्यांना दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 11:55 PM

किसान प्रदर्शनाचा आज पहिला दिवस होता.

पुणे : शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची ओळख व्हावी,  डिजीटल अॅग्रीकल्चर कळावे आणि नव्या नव्या उत्पादनाच्या उत्पादकांना भेटता यावे यासाठी 'किसान' कडून शेतकरी प्रदर्शन आयोजित करण्यात येत असते. हे प्रदर्शन पुणे आणि हैद्राबाद येथे होत असते. तर यंदाचे पुण्यातील प्रदर्शन मोशी येथे भरले असून या प्रदर्शनाचा आज पहिला दिवस होता.

दरम्यान, देशातील सर्वांत मोठ्या शेतकरी प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी हजारो शेतकऱ्यांनी भेट दिली. त्यांना या ठिकाणी नव्या गोष्टी पाहण्यास मिळाल्या आहेत. या प्रदर्शनाची शेवटची तारीख ही १७ डिसेंबर असून शेतकऱ्यांना या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी अजून चार दिवस असणार आहेत. तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हे प्रदर्शन पाहण्याची संधी घेतली पाहिजे. 

शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची ओळख 

आज पहिल्या दिवशी प्रदर्शनाला भेट दिलेल्या शेतकऱ्यांना नवनवे तंत्रज्ञान, प्रकल्प, शासनाच्या योजना, शेती निविष्ठा, उत्पादने, दर्जेदार खते, बियाणे, कीटकनाशके, औषधे पाहायला मिळाल्या. त्याचबरोबर ही उत्पादने तयार करणाऱ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना भेटण्याची संधी शेतकऱ्यांना मिळाली. शेती औजारांमध्ये पॉवर टीलर, मोठ्या क्षमतेचे ट्रॅक्टर, क्रॉप हार्वेस्टर, छोटेछोटे यंत्रसुद्धा या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळाले.

राज्यभरातून आणि देशभरातून आलेल्या शेतकऱ्यांनी दिल्या भेटी

हे प्रदर्शन पाहण्यासाठी देशभरातून आणि देशाबाहेरील शेतकऱ्यांनी सुद्धा हजेरी लावली होती. गुजरात, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, दिल्ली, हरियाणा, केरळ, तामिळनाडू या राज्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा किसान प्रदर्शनाला भेटी दिल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, नाशिक, पुणे, नगर, छत्रपती संभाजीनगर. बीड, धारशिव, सोलापूर, सांगली, पुणे, सातारा आणि कोकण भागातील रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची संख्या जास्त होती. त्याचबरोबर इतर जिल्ह्यांतून आलेल्या शेतकऱ्यांची संख्याही लक्षणीय होती. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीतंत्रज्ञान