शिवचरण वावळे :
Farmers are prosperous through various schemes : अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोखरा) योजनेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात जालना जिल्ह्यातील दहा वीस नव्हे तब्बल ९६ हजार शेतकऱ्यांनी विविध योजनांचा लाभ घेत शेतीमध्ये प्रगती केल्याचे चित्र दिसते.
यासाठी शासनाच्या वतीने तब्बल ७८६ कोटींचा निधीही खर्च करण्यात आला आहे. याद्वारे शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होत असून, लवकरच पोखराचा दुसरा टप्पाही सुरू केला जाणार आहे.
२०१८ साली पोखरांतर्गत विविध योजनांची अंमलबजावणी शासनाकडून सुरू करण्यात आली होती. योजनेच्या माध्यमातून शेतीपयोगी साधने आणि साहित्य योजनांचा लाभ देण्यात आला आहे. जून महिन्यात योजनेचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून,
यामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेडनेट हाउस, ठिंबक सिंचन, तुषार सिंचन, फळबाग लागवड, शेततळे, मत्स्यपालन, नवीन विहीर, पंप संच, पाइप, पॉली टनेल, हरितगृह, शेडनेट हाउसमधील लागवड साहित्य, पॉली हाऊस, गांडूळ खतनिर्मिती, बंदिस्त शेळीपालन, बीजोत्पादन, मधुमक्षिकापालन, रुंद वाफा व सरी तंत्रज्ञान अवलंबण्यास प्रोत्साहन, रेशीम उद्योग, विहीर पुनर्भरण, कृषी यांत्रिकीकरण, शेततळे अस्तरीकरण व इतर योजनांचा लाभ घेतला आहे.
योजनेत शासनाने ७६८ कोटी १९ लाख रुपये इतके अनुदान वाटप केले आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेली ''नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोखरा) योजने''चा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. त्यामुळे योजनेचा दुसरा टप्पा कधी सुरू होणार अशी शेतकऱ्यांकडून विचारणा होत आहे. योजनेस बजेट प्राप्त होताच दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगितले जात आहे. या दुसऱ्या टप्प्यातही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
नवीन विहीर, शेततळ्यामुळे पाण्याची उपलब्धता
पोखरांतर्गत नवीन विहीर, शेततळ्यांची योजनाही राबविण्यात आली आहे. याचा जवळपास तीन हजारावर शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. त्यामुळे संबंधितांना शेतीसाठी पाण्याची उपलब्धता झाली आहे.
याच योजनेंतर्गत ठिबक, तुषारचाही लाभ शेतकऱ्यांनी घेतला असून, कमी पाण्यात अधिक उत्पन्न घेण्यास त्यामुळे मदत झाली आहे. विविध घटक योजनांद्वारे शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत.
कुठल्या योजनेसाठी घेतले शेतकऱ्यांनी अनुदान
घटक योजना | लाभार्थी | रक्कम कोटीत |
शेडनेट हाउस | ३२४७ | २६६.४३ |
ठिबक सिंचन | ३८५८३ | ३०९.६३ |
तुषार सिंचन | २१७७७ | ४०.१२ |
फळबाग लागवड | १७९१४ | ६१.११ |
पॉली टनेल | ११ | १.१८ |
गांडूळ खतनिर्मिती | ३२ | ०,०२ |
बंदिस्त शेळीपालन | १२३ | ०.५० |
बीजोत्पादन | ७६० | ०.६९ |
मधुमक्षिकापालन | ५४ | ०.८१ |
शेततळे | २८७८ | ६१.०१ |
सरी तंत्रज्ञान अवलंबण्यास प्रोत्साहन | ४०१ | ०.१२ |
मत्स्यपालन | १२९२ | ३.२९ |
रेशीम उद्योग | १०१० | ७.१९ |
नवीन विहीर | २५८ | ६.२४ |
विहीर पुनर्भरण | २७ | ०,०३ |
पंप सच | ३०५५ | ४.४९ |
कृषी यांत्रिकीकरण | ५९१ | ४.५ |
पाइप | २४३३ | ४.७३ |
इतर | ९७ | ०.९४ |
शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी योजना
शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी शासनाच्या वतीने जिल्ह्यात पोखरांतर्गत विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ३६३ गावांतील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे. त्याद्वारे विविध कामे शेतीत झाली असून, शेतकऱ्यांना सक्षम होण्यास त्याची मदत होत आहे.
- जी. आर. कापसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी