दिनेश पाठक
एनसीसीएफ आणि 'नाफेड'च्या माध्यमातून महाराष्ट्रातून दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालिका अनिस जोसेफ चंद्रा (दिल्ली) यांनी येथे डिसेंबर २०२३ मध्ये पत्रकार परिषदेत दिली होती. मात्र, त्यांचा हा दावा पूर्णपणे फोल ठरला असून, राज्यातून फक्त ६० हजार मेट्रिक टन कांदा केंद्रीय स्तरावर खरेदी करण्यात आला आहे. त्यामुळे चंद्रा यांची घोषणा कागदावरच राहिली.
निर्यातबंदीमुळे वैफल्यग्रस्त असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एनसीसीएफ आणि नाफेडच्या कांदा खरेदी केंद्राकडे पाठ फिरविल्याने चार दिवसांपासून एनसीसीएफने राज्यातील आपल्या कांदा खरेदी केंद्राला टाळे ठोकले आहे. एनसीसीएफ खरेदी केंद्र सुरू असल्याचा संबंधित अधिकाऱ्यांचा दावादेखील फोल ठरला आहे. अजून कांदा येईल या आशेवर अधिकारी आहेत.
नाशिकसह अहमदनगर, धुळे, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतून कांदा खरेदी नोव्हेंबरमध्ये सुरू करण्यात आली होती. मात्र, अनेकदा खरेदी केंद्रांना टाळे होते, अशी ओरड शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकरी संघटनांनी यासंदर्भात केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे आपली कैफियतदेखील मांडली आहे.
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगावबसवंत व विंचूर येथील एनसीसीएफच्या कांदा खरेदी केंद्राला टाळे आहे, तर अहमदनगर जिल्ह्यातील दहा, पुणे जिल्ह्यातील तीन, जळगाव जिल्ह्यातील दोन, तसेच अन्य ठिकाणच्या कांदा खरेदी केंद्रही चार ते पाच दिवसांपासून बंद आहेत. काही केंद्रे बंद आहेत. ते पुन्हा सुरू करू, अशी माहिती एनसीसीएफचे व्यवस्थापक एम. परिक्षित यांनी दिली.