पैठण : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनेकदा काटामारी करून फसवले जाते त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असते. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला असून पैठण तालुक्यातील मायगाव येथे एका व्यापाऱ्याने खिशात रिमोट ठेवून काटामारी केल्याचा प्रकार शेतकऱ्यांनी उघडकीस आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित व्यापाऱ्याला शेतकऱ्यांकडून चांगलाच चोप देण्यात आला आहे. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अधिक माहितीनुसार, हा व्हिडिओ पैठण तालुक्यातील मायगाव येथील असून येथील कापूस व्यापारी पांडे हा खरेदी करत असताना खिशात रिमोट ठेवून काटा मारत असताना शेतकऱ्यांनी रंगेहात पकडला. ही फसवणूक उघडी पडल्यानंतर शेतकऱ्यांनी या व्यापाऱ्याला चोप दिला असून घटनेचा व्हिडिओ शूट केला आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कापूस खरेदी करत असताना सदर व्यापारी हा सारखा खिशात हात घालत होता किंवा काट्यावर कापूस ठेवल्यानंतर तो खिशाच्या वरून हात ठेवत होता. त्यामुळे आम्हाला संशय आला आणि त्यांनी तपासले असता त्याच्या खिशात रिमोट आढळून आले. या रिमोटला तीन बटणे होती, त्या तीन बटणावरून ५ किलो, ७ किलो आणि १० किलोच्या वजनाची सेटिंग करून ठेवली होती असं प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी सांगितलं.
दरम्यान, अनेक व्यापाऱ्यांकडून अशा प्रकारची फसवणूक केली जात असल्याच्या घटना याआधी घडल्या आहेत. वजनकाट्यावरही काटामारी होत असल्याच्या घटना अनेकदा घडल्या असून यामध्ये शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्री करत असताना इलेक्ट्रॉनिक काट्यावर न देता वजनकाटा किंवा घोडी काट्यावर द्यावा असा सल्ला अनेकांकडून देण्यात येत आहे.
संबंधित व्यापारी हा अडूळ येथील असून त्याने पैठण तालुक्यातील मायगाव येथील शेतकऱ्यांच्या कापसाच्या गाड्या भरल्या होत्या. शेतकऱ्यांना ज्यावेळी हा प्रकार कळाला त्यावेळी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याला मारहाण केली. यावेळी व्यापारी खूप घाबरलेला होता, घटना घडल्यानंतर सदर व्यापाऱ्याने ज्या शेतकऱ्यांचा कापूस घेतला होता त्याने शेतकऱ्यांना एका क्विंटलपाठीमागे २० किलोचे वाढीव पैसेसुद्धा दिले. त्यामुळे व्यापाऱ्याविरोधात कुणीच तक्रार दाखल केली नाही.
- गीता दसपुते (सरपंच, मायगाव)