Join us

शेतकऱ्यांनी लढवली शक्कल; यंदा करवंदाने धुरे व्यापणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 1:10 PM

रोपांची आयात करून त्याचे शेताला कुंपण करण्याची प्रक्रिया..

वाशिम जिल्ह्यातील अधिकांश शेती क्षेत्र कोरडवाहू आहे. त्यातच खरीप व रब्बी हंगामातील पिके वाढण्याच्या काळात जंगली जनावरांकडून हल्लाबोल होण्याचा प्रकार वाढीस लागला आहे. यामुळे शेतकरी जेरीस आले आहेत.

त्यावर शक्कल लढवत देपुळातील शेतकऱ्यांनी शेतीचे धुरे काटेरी करवंदाने व्यापण्याचा निर्धार केला आहे. वसमत (जि. हिंगोली) येथून रोपांची आयात करून त्याचे शेताला कुंपण करण्याची प्रक्रिया सध्या राबविण्यात येत आहे.

करवंदांची झाडे पूर्णतः काटेरी असतात. याशिवाय वाढ होत असताना जवळची दोन झाडे एकमेकांमध्ये गुंफली जाऊन त्याची घट्ट जाळी तयार होते. ती सहजासहजी छेदल्या जात नाही.

शेतीच्या सभोवताल या झाडांची योग्यरीत्या लागवड केल्यास नैसर्गिकरीत्या काटेरी कुंपण तयार होऊन मोकाट जनावरे आणि जंगली श्वापदांपासून शेतीचे संरक्षण होणे सहज शक्य आहे. ही बाब लक्षात घेऊन देपूळ येथील शेतकरी सुभाष फकिरा ताकड यांनी त्यांच्या चार एकर शेतीच्या धुऱ्यावर ८०० करवंदांची झाडे लावण्याची तयारी चालविली आहे. 

त्यासाठी वसमत येथून दर्जेदार रोपे उपलब्ध झाली आहेत. त्यांच्या या संकल्पनेचा आदर्श समोर ठेवून इतरही अनेक शेतकऱ्यांनी शेताला करवंदाचे कुंपण करण्याचा निर्धार केला आहे.

शेतीचे संरक्षण अन् लाखोंचे उत्पन्नही

काटेरी करवंदाच्या नैसर्गिक जाळीने शेतीचे संरक्षण होतेच; शिवाय झाडांना लागणाऱ्या करवंदांना भारी डिमांड असल्याने लाखोंचे उत्पन्नही या माध्यमातून घेता येणे शक्य आहे. करवंदाचा मुरब्बा ४०० रुपये प्रतिकिलोने विकला जात असल्याने शेतकऱ्यांसाठी ही बाब सर्वार्थाने फायदेशीर ठरणारी आहे.

देपूळ परिसरातील शेतीला वन्यप्राण्यांचा धोका कायमच लागून असतो. यामुळे पिकांची प्रचंड हानी होत आहे. शेतीला नैसर्गिक कुंपण असावे आणि त्यापासून थोडीफार मिळकतही व्हावी, या उद्देशाने धुऱ्यावर करवंदांची झाडे लावण्याची तयारी केली आहे. - सुभाष तागड, शेतकरी.

हेही वाचा - सर्व शेतकरी बांधवांच्या मोबाईल मध्ये असावेत असे शेती पिकांसाठी फायद्याचे मोबाईल ॲप्स

टॅग्स :शेतीशेतकरीपीक व्यवस्थापनशेती क्षेत्रविदर्भमराठवाडा