जगदीश कोष्टी
कमी वेळेत जास्त उत्पादन मिळविण्यासाठी शेतकरी, व्यापारी फळे, भाज्यांवर रासायनिक द्रवांचा मारा करत असतात. सुरुवातीच्या काळात डोळ्यांना भुरळ पाडणारी फळे, भाज्यांचे कौतुक असत. ते खरेदी केली जात. पण, आता ग्राहकही आरोग्याच्या बाबतीत सजग होत आहेत.
त्यामुळेच सेंद्रिय भाज्यांना मागणी वाढत आहे. याचे बाळकडू शाळेतूनही मिळत आहेत. पोषण आहारासाठी लागणारा भाजीपाला मुलं स्वतःच पिकवत आहेत, तेही सेंद्रिय पद्धतीने.
सातारा जिल्हा ही शेती प्रधान म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याच्या विविध भागात विविध प्रकारचे भौगोलिक वातावरण, माती, जमीन, हवामान आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात कृषी उत्पादनात विविधता पाहायला मिळते.
कोरेगाव तालुक्यातील राजमाने दिल्ली, हैदराबादची बाजारपेठ काबीज केली आहे. तर, महाबळेश्वरची लालचुटूक स्ट्रॉबेरी जगाला मोहिनी घालत असते, त्याचबरोबर आलं, हळद, बटाटा आदी पिकांचा सर्वत्र बोलबाला आहे.
कृषीच्या बाबतीत समृद्धता असली तरी सातारा जिल्ह्यातील बाजारपेठेत येणारी बहुतांश फळे, भाज्यांवर रासायनिक खते, औषधांचा मारा केलेला दिसून येतो. फळे लवकर पिकविण्यासाठी इंजेक्शनही दिले जात असल्याचे समोर येत असते. त्यातून अनेक जीवघेणे आजार घरात घेऊन जातो.
याबाबत बऱ्यापैकी जनजागृती झालेली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं, वयात येणाऱ्या मुलींच्या आरोग्याचा विचार करुन सेंद्रिय भाज्यांना मागणी वाढत आहे.
शाळेतूनच बाळकडू
• जिल्हा परिषदेच्या शाळेत पोषण आहार जातो. तेव्हा बहुतांश शाळांमध्ये परसबाग हा उपक्रम राबविला जातो.
• यामध्ये गुरुजी आणि मुलंच त्यांना लागणारा भाजीपाला पिकवत असतात. यामध्ये कोठेही रासायनिक खतांचा वापर केला जात नाही.
• झाडांचा वाळलेला पाला-पाचोळा, शेणखत, गांडूळ खत टाकला जातो.
• यामुळे पुढील पिढी आणखी जागरुक झालेली पाहायला मिळणार आहे.
• स्वतःची भाजी स्वतः पिकविण्याची सवय लागल्यास ते मोठे झाल्यानंतर स्वतः पिकवणार आहेत.
कमी वेळेत चांगला भाजीपाला पिकावा, त्याचा आकार मोठा असावा यासाठी बहुतांश शेतकरी रासायनिक खते देतात, व्यापारीही फळे लवकर पिकविण्यासाठी इंजेक्शन देतात. हेच पदार्थ पोटात गेल्यास अनेक व्याधी डोके वर काढतात. त्यामुळे विश्वासातील शेतकऱ्यांकडूनच भाजी घेत असतो. - कल्पना माने, सातारा.
विक्रेते म्हणतात 'सेंद्रिय' पण खात्री कोठे?
• कौटुंबिक डॉक्टर, समाजमाध्यमे किवा प्रसारमाध्यमातून रासायनिक फळे, भाजी झाल्यामुळे होणाऱ्या दुर्धर आजाराबाबत काही माहिती कानावर पडत असते. अगदी कर्करोगही यामुळे होतो हे कळल्यामुळे अंगावर काटा येतो. विशेषतः घरातून सेंद्रिय भाज्या, फळे आणा म्हणून फर्मानही सोडले जाते.
• पण, सेंद्रिय कोणते आणि रासायनिक कोणते हेच अनेकांना कळत नाही. त्यामुळे काहीजण विक्रेत्याला विचारून घेतात. आता विक्रेत्यांनाही ग्राहकांची मानसिकता माहीत झाली आहे. त्यामुळे ते 'स्वतःच साहेब सेंद्रिय आहेत घ्या, असे सांगून माल विकत असतात.
गच्चीवरील परसबागेसाठी उभारतेय चळवळ
• सातारकरांना सेंद्रिय भाजीपाला आहारात मिळावा यासाठी आपली भाजी आपणच पिकविणे आवश्यक आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी साताऱ्यात हरित साताराच्या माध्यमातून गच्चीवरील परसबाग ही चळवळ उभारत आहे.
• यासाठी सातारकरांना विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करुन दिले जाणार आहे. त्याची सुरुवातही झाली आहे.
• यामध्ये गच्चीवर बाग करताना काय काळजी घ्यावी, पालापाचोळा, ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती, कुंड्या भरण्यासाठी मिश्रण करणे, फुलझाडे व भाजीपाला लागवड, बागेतील झाडांचे आरोग्य कसे सांभाळाल आदींबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
• अशाप्रकारे सातारकरांनी दररोज लागणारी भाजी गच्चीवर किंवा गॅलरीत पिकवली तर त्यांना दररोज सेंद्रिय पद्धतीचा भाजीपाला खायला मिळणार आहे.
हेही वाचा : Health Benefits Of Amaranth अमरंथच्या पर्णांचे पोषणतत्त्व आणि आरोग्यदायी फायदे