मधुकर शिरसाठ
केज (जि.बीड) महागड्या रासायनिक खतांची उपयुक्तता वाढविण्यासाठी तसेच कीडकनाशकांचा वापर टाळून त्याला पर्याय म्हणून निंबोळी अर्क, निंबोळी पेंड वापरल्यास उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होते. सद्यस्थितीत परिपक्व अवस्थेमध्ये असलेल्या कडुलिंबाच्या निंबोळ्या शेतकऱ्यांनी गोळा करून त्याचा वापर करण्याचे आवाहन कृषी अभ्यासक शिवप्रसाद येळकर यांनी केले आहे.
नॅचरल शुगर रांजणी व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने केज तालुक्यातील कानडीबदन येथे रविवारी झालेल्या शेतीशाळेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शिवप्रसाद येळकर म्हणाले की, निंबोळीमधील अॅझाडीरेक्टिन, निम्बीन, सलानिन हे घटक १०० ते एक हजार पीपीएमपर्यंत तसेच सिलिका १५ टक्केसह इतर उपयोगी तत्व असतात.
यात ५ ते ७ टक्के तेल असते. त्यामुळे कीटकनाशक गुणधर्मासह इतर अन्नद्रव्ये शेतात मिसळले जातात. यात नत्र ३.५ ५%, स्फुरद १% व पालाश २ % या प्रमाणात असून, पिकांच्या मुळांना हळूहळू उपलब्ध होतो. निंबोळी पेंडीतील विविध घटक जमिनीमध्ये मिसळल्यानंतर मुळांद्वारे शोषले जातात.
या पद्धतीमुळे जमिनीतील किडींचे तसेच पिकांवरील रसशोषक किडींना अटकाव करता येतो. जमिनीतील हानिकारक किडी जसे, मुळे कुरतडणाऱ्या अळ्या, हुमणी, मिलीबग आदींवर नियंत्रण ठेवता येते. निंबोळी पेंडीतील घटक जमिनीत हळूहळू मात्र दीर्घकाळपर्यंत काम करतात.
त्यामुळे सहा महिन्यांपर्यंत त्यांचा परिणाम दिसून येतो. रासायनिक नत्रयुक्त खताची २५ टक्क्यांपर्यंत बचत होते, याची विस्तृतपणे माहिती देऊन कडुनिंबाच्या निंबोळ्या गोळा करण्याचे प्रशिक्षण देताना त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच प्रात्यक्षिक करुन दाखविताना येळकर यांनी शेतकऱ्यांना याविषयी मार्गदर्शनही केले.
निंबोळी अर्काचे वाटप
सद्यस्थितीत ऊस पिकामधील क्लोरोसिस, कीड रोग व अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या उपाययोजनाही येळकर यांनी यावेळी शेतकऱ्यांना सूचविल्या. कृषी सहायक आय. आर. शेख यांनी उपस्थित सर्व शेतकऱ्यांना निबोळी अर्कच्या बाटल्या वितरित केल्या. सद्यस्थितीत सोयाबीन पिकांमधील कीड व्यवस्थापनाची माहिती दिली. यावेळी जय किसान महिला व पुरुष शेतकरी गटाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा - Dashparni Arka बहूपयोगी सेंद्रिय कीटकनाशक 'दशपर्णी अर्क' असे करा घरच्याघरी