Join us

शेतातील तण हटवण्यासाठी शेतकरी करतायत या भाताची लागवड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2024 12:46 PM

Tulsi Bhat भात पिकाचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिराळा तालुक्यात जुन्या काळातील तुळशी भात दुर्मीळ होत चालले असले तरीही त्याचे अस्तित्व मात्र टिकून आहे. तालुक्यात ठिकठिकाणी आजही तुळशी भात केल्याचे दिसून येत आहे.

सहदेव खोतपुनवत : भात पिकाचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिराळा तालुक्यात जुन्या काळातील तुळशी भात दुर्मीळ होत चालले असले तरीही त्याचे अस्तित्व मात्र टिकून आहे. तालुक्यात ठिकठिकाणी आजही तुळशी भात केल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यात या भाताचे उत्पन्न जरी मोठ्या प्रमाणात नसले तरी शेतातील तण हटवण्यासाठी हे पीक शेतकऱ्यांकडून घेतले जात आहे. शिराळा तालुका हा भात शेतीसाठी प्रसिद्ध आहे. तालुक्यात खरीप हंगामात भात पिकाची लागवड केली जाते.

टोकण, रोपण, तसेच कुरीच्या साहाय्याने भात पीक पेरले जाते. तालुक्यात रत्ना १, रत्नागिरी २४, शिराळी मोठे, चिरमुरे, भोगावती, कोमल, सोनम, तृप्ती, जिरेसाळी अशा विविध जातीच्या वाणांपासून भात पीक घेतले जाते. विशेष करून शेतकरी संकरित बियाण्यांचाच वापर करतात.

तुळशी भाताची वैशिष्ट्ये- तालुक्यातील जुन्या बियाण्यांपैकी एक बियाणे म्हणजे तुळशी.या भाताचे खोड काळ्या रंगाचे असते तर तांदूळही थोडा काळपट असतो.खोडाची उंची तीन ते चार फूट असते.हे भात परिपक्व होण्यासाठी तीन ते साडेतीन महिन्यांचा कालावधी लागतो.तणांचा नायनाट करण्यासाठी उपयुक्तया भाताला उत्पन्न साधारण असते.याचा तांदूळ चविष्ट व पौष्टिक असतो.या भाताचे पिंजर काळ्या रंगाचे असते.

साधारणपणे भात पिकात तणांचे प्रमाण जास्त असते. भात पिकाची दोन-तीन वेळा भांगलण करावी लागते. शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. एखाद्या शेतात जर तणांचे प्रमाण वाढले तर त्याचा पिकाला फटका बसतो.

म्हणून शेतकरी एखाद्या वर्षी तणांचा नायनाट करण्यासाठी काळ्या खोडाचे तुळशी भात शेतात पेरतात. हे भात पेरल्याने पिकातील हिरव्या रंगाचे तण सहज ओळखून येते व त्याचा नायनाट करता येतो. तालुक्यात जुनी भाताची बियाणी नामशेष होण्याच्या मार्गावर असली तरी काही बियाण्यांचे अस्तित्व अजूनही टिकून आहे.

शेतकरी घरगुती पद्धतीने या बियाण्याची निर्मिती करतात व एकमेकांमध्ये देवघेव करतात. तुळशी भाताचे बियाणे बाजारात मिळत नाही. तालुक्यात ठिकठिकाणी या भाताची लागवड केल्याचे निदर्शनास येत आहे.

शेतात तण प्रकारातील झडणाऱ्या भाताचे प्रमाण वाढले होते. या तणाला आळा घालण्यासाठी मी १० गुंठे शेतात काळ्या खोडाच्या तुळशी भाताची लागवड केली आहे. स्वतः जतन केलेल्या बियाण्याचा वापर केला आहे. दरवर्षी एका शेतात तुळशी भाताची लागवड करतो. - संतोष पाटील

टॅग्स :भातशेतकरीशेतीपीकशिराळासांगलीपेरणीलागवड, मशागतरत्नागिरी