वादळीवाऱ्यासह झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने मागील तीन महिन्यांत जिल्ह्यात ७ हजार ७८० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील विविध पिकांचे नुकसान झाले आहे. सततच्या अवकाळी पावसाने वारंवार पिकांचे नुकसान होऊन शेतकरी हतबल झाला आहे.
दरम्यान, एप्रिल महिन्यात झालेल्या पीक नुकसानाचे पंचनामेही पूर्ण झाले असून, बाधित शेतकन्यांना मदतीसाठी आवश्यक निधीबाबतचा अहवाल विभागस्तरावर वाशिम जिल्हा प्रशासनाकडून सादर करण्यात आला आहे.
वाशिम जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून वारंवार अवकाळी पाऊस पडत आहे. या नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक हिरावले गेले. शेतकरी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या नुकसानाला विसरून उन्हाळी हंगामाच्या तयारीला लागला, तर एप्रिल महिन्यातही परिपक्व अवस्थेत आलेल्या पिकांना पुन्हा अवकाळी पावसाचा फटका बसला.
अशातच लोकसभा निवडणुकीची धामधूम असल्याने या पीक नुकसानाचे पंचनामे रखडले. लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर या नुकसानाचे पंचनामे पूर्ण झाले. यात १ हजार ९७७ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील पिकांचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले.
वाशिम जिल्ह्यात फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यात तब्बल ७ हजार ७८० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील पिके अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नेस्तानाबूद झाल्याचे एप्रिलमधी पीक नुकसानाच्या पंचनाम्यानंतर स्पष्ट झाले.
अवकाळीने वाशिम जिल्ह्यातील २०७ गावांना अवकाळीचा तडाखा बसला आहे. ज्यात २,८०१ शेतकरी बाधित झाले आहे. १९७७.९६ एप्रिलमधील पीक नुकसान असून ३९४.८० मार्चमधील पीक नुकसान आहे. मार्च मध्ये ७२७ बाधित शेतकरी आहेत. ८,२८१ बाधित शेतकरी संख्या फेब्रुवारी मधील असून ५४०७,८८ हेक्टर फेब्रुवारीमधील पीक नुकसान झाले आहे. एकूण ७,७८०,६४ हेक्टर तीन महिन्यात झालेले पीक नुकसान आहे.
११,८०९ शेतकऱ्यांचे नुकसान
• गत तीन महिन्यात वारंवार झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने तब्बल ११ हजार ८०९ शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
• त्यात फेब्रुवारी महिन्यातील अवकाळी पावसाचा ८२८१ शेतकऱ्यांना फटका बसला. मार्च महिन्यातील अवकाळी पावसाचा ७२७ शेतकऱ्यांना, तर एप्रिलमधील अवकाळी पावसाचा २ हजार ८०१ शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
२०७ गावांना अवकाळीचा तडाखा
जिल्ह्यात फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा जिल्ह्यातील २०७ गावांना तडाखा बसला. यामध्ये फेब्रुवारी महिन्यात १२ गावांना, मार्च महिन्यात १३ गावांना, तर एप्रिल महिन्यात १०२ गावांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसल्याचे प्रशासनाकडून विभागस्तरावर सादर करण्यात आलेल्या अंतीम अहवालातून स्पष्ट होत आहे.