Join us

'आयटीआर'मुळे वगळलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा 'सन्मान'; पीएम किसान निधीचा मिळणार फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 9:55 AM

पीककर्जासाठी विवरणपत्रे (फॉर्म १६) व आर्थिक विवरणपत्रे भरून घेतलेले शेतकरी प्राप्तिकराच्या मर्यादेत आले. त्यामुळे पंतप्रधान किसान सन्मान योजनेत अशा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना मिळालेल्या लाभाची वसुली करण्यातही आली.

नितीन चौधरीपुणे : पीककर्जासाठी विवरणपत्रे (फॉर्म १६) व आर्थिक विवरणपत्रे भरून घेतलेले शेतकरी प्राप्तिकराच्या मर्यादेत आले. त्यामुळे पंतप्रधान किसान सन्मान योजनेत अशा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना मिळालेल्या लाभाची वसुली करण्यातही आली. मात्र, केंद्र सरकारने यात आता बदल केला असून, केवळ एकदा विवरणपत्र भरलेल्या शेतकऱ्यांना आता पूर्वीच्या थकलेल्या हप्त्यांसह फेब्रुवारीच्या अखेरीस देण्यात येणारा १६ वा हप्ताही मिळणार आहे.

एकट्या पुणे जिल्ह्यात अशा शेतकऱ्यांकडून करण्यात येणारी ३० कोटी ४७ लाखांची वसुली आता थांबणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेबाबत केंद्र सरकारने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयानुसार प्राप्तिकर भरणारे शेतकरी, शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच ज्याचे उत्पन्न जास्त आहे, अशा शेतकऱ्यांना लाभ नाकारला होता. त्यामुळे या योजनेतून लाभार्थी शेतकऱ्यांकडून या लाभाची वसुली करण्याचे काम सुरू होते. 

निकष बदलले, शेतकरी वाढणार• पंतप्रधान किसान सन्मान योजना ही आता पूर्णतः कृषी विभा गामार्फत राबवली जात असली तरी प्राप्तिकर भरणाऱ्या शेतकऱ्यांकडील लाभाची वसुली करण्याचे काम महसूल विभाग करत आहे. एकट्या पुणे जिल्ह्यात असे २८ हजार ७६४ शेतकरी असून त्यांनी १ लाख ५२ हजार ३९२ हप्ते घेतल्याचे स्पष्ट झाले होते, त्यानुसार या शेतकऱ्यांकडून ३० कोटी ४७ लाख ८४ हजार रुपयांची वसुली करण्याचे आव्हान महसूल विभागाला होते.• या वसुलीचे काम अतिशय संथगतीने सुरू होते. काही शेतकऱ्यांनी ही वसुली ही थकबाकी परत केली, तरीदेखील ९५ टक्क्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी थकबाकी भरली नव्हती. मात्र, केंद्र सरकारने आता या अटीत बदल केला आहे. त्यानुसार २०१९ पासून सलग दोन दोन वर्षे प्राप्तिकर भरलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. मात्र, केवळ एक वेळाच प्राप्तिकर भरलेला असल्यास अशा शेतकऱ्यांना आता या योजनेत पात्र ठरविण्यात आले आहे.

थकबाकी घटणार• पीककर्जासाठी या शेतकऱ्यांकडून बँकांनी फॉर्म १६ भरून घेतल्याने हे शेतकरी प्राप्तिकराच्या मयदित आले होते. मात्र, शेतकरी पात्र असूनही त्यांना लाभ मिळणे बंद झाले होते. मात्र, अशा शेतकऱ्यांकडून आता ही थकबाकी वसूल केली जाणार नाही. तर, त्यांना यापूर्वीचे लाभ देण्यासही केंद्र सरकारने सुरुवात केली आहे.• किसान सन्मान निधीच्या पोर्टलवरून अशा शेतकऱ्यांची यादी तयार करून संबंधितांना लाभ देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या निर्णयामुळे आता पुणे जिल्ह्यातील थकबाकी केवळ एक कोटीच्या घरातच राहील, अशी माहिती सूत्रांनी दिली.• राज्यभरातही अशा प्राप्तिकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी मोठी असून, केंद्र सरकारच्या निर्णयामुळे वसुलीची रक्कम मोठ्या प्रमाणावर घटणार आहे. दुसरीकडे, पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा सोळावा हप्ता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात देण्यात येणार होता. मात्र, काही कारणास्तव तो आता महिनाअखेरीस देण्यात येणार आहे.• प्राप्तिकर भरणाऱ्यांच्या यादीत असलेल्या अशा शेतकऱ्यांनाही आता या यादीत समाविष्ट केले जाणार असल्याने सोळाव्या हप्त्यातील शेतकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाशेतकरीशेतीकेंद्र सरकारसरकारकरइन्कम टॅक्सबँक