Join us

शेतकऱ्यांनो, बिनधास्त करा खत बियाण्यांची तक्रार; मोबाइल नंबर उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2024 4:53 PM

शेतकरी बांधवांसाठी तक्रार निवारण केंद्र या जिल्ह्यात होतय सुरू

खरीप हंगामाचे कृषी विभागाकडून आतापासून नियोजन केले जात असून या हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या खते, किटकनाशके, कृषी निविष्ठा व बियाणे संबंधित तक्रारी प्राप्त करण्यासाठी बीड जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. या कक्षासाठी ९४०३३०८६०८ हा मोबाइल नंबर उपलब्ध करुन दिला आहे. या कक्षाचे कामकाज १ जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत चालणार आहे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या खते, - कीटकनाशकांविषयी अनेक तक्रारी असतात. त्यांना वेळेवर तक्रारी दाखल करता याव्यात यासाठी कृषी विभागाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून खते, किटकनाशके, कृषी निविष्ठा व बियाणे यांच्या तक्रारीसाठी जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.

९४०३३०८६०८ या मोबाइल क्रमांकावर शेतकऱ्यांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची नोंदवहीत नोंद केली जाणार आहे. या तक्रारी जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी सहायक कर्मचाऱ्याची नियुक्त केली जाणार आहे.

सदरील तक्रार निवारण कक्ष हा सकाळी ९.३० ते रात्री ७ यावेळेत सुरु राहणार आहे. याबाबतच प्रशिक्षण जिल्हा गुण नियंत्रण व सहकारी यांच्याकडून आयोजित केले जाणार आहे. तसेच संबंधितांना तपशीलवार सूचना देण्यात येणार आहे. यासंबंधीचा आदेश बीड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी काढला आहे. सदरील कक्ष वेळीच कार्यान्वित करण्याचेही सांगण्यात आले आहे.

हेही वाचा - दुष्काळात फळबाग संशोधन केंद्राने विकसित केलेले हे तंत्र वापरा आणि फळबागा वाचवा

टॅग्स :खतेशेतीशेतकरीशेती क्षेत्र