गजानन मोहोड
कृषिप्रधान देशात आता शेतीला दुय्यम स्थान मिळत असल्याने तरुणाईचा ओढा कमी होत आहे. याचा थेट परिणाम भू-धारणेवर झाला आहे. जिल्ह्यात सद्यःस्थितीत अत्यल्प व अल्प भू-धारकांची संख्या ७४ टक्क्यांच्या घरात आहे. त्या तुलनेत बहुभूधारक फक्त २६ टक्के शेतकरी आहेत. हेक्टरातील शेतकरी एकरावर आल्याने अमरावती जिल्ह्यात ही स्थिती ओढवल्याचे वास्तव आहे.
अमरावती जिल्ह्याची अर्थव्यवस्था आजही कृषी क्षेत्रावर आधारित आहे. बहुतांश कुटुंबे बहुभूधारक होती. मात्र, कालांतराने कुटुंबातील संख्या वाढल्याने परिवार हेक्टरवर व आता एकरावर अन् गुंठ्यावर आले आहेत. सातत्याने दुष्काळ, नापिकी शिवाय उत्पन्नाचा दुसरा कोणताही स्रोत नसल्याने विविध कारणांनी जमिनीची विक्री झाली व आज ही स्थिती ओढवली आहे.
कृषी विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात शेतकरी संख्या ४,७०,२०५ व शेतजमिनीचे क्षेत्र १२ लाख हेक्टरपर्यंत आहे. यामध्ये सरासरी भू-धारणा एक हेक्टरपर्यंत आहे. शेतकऱ्यांचे खरिपाचे प्रमुख पीक कपाशी, तूर, सोयाबीन व रब्बी हंगामात गहू व हरभरा शिवाय फळबागेमध्ये संत्रा आहे.
पारंपरिक पिकांकडेच शेतकऱ्यांचा कल आहे व अलीकडे निसर्गाची साथ नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कमकुवत झालेली आहे. अशा परिस्थितीत शासन योजनांची साथ अन् शेतीपूरक व्यवसायाची जोड मिळणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
आगामी काळासाठी धोक्याची घंटा
आधीच भू-धारणा कमी व त्यातच शेतकरी कुटुंबातील सदस्य संख्या वाढत असल्याने जमिनीचे तुकडे पडत आहेत. गावालगतच्या जमिनी विकसित होत असल्याने अकृषक झाल्या आहेत. परिवारातील संख्या वाढत असल्याने जमिनीचे क्षेत्र झपाट्याने कमी होत आहे. यासह अनेक बाबी आगामी काळासाठी धोक्याची घंटा ठरत आहेत.
शेतीपूरक व्यवसाय आवश्यक
शेती व्यवसायाला निसर्गाची साथ नाही व सिंचनाची सुविधा नसल्यास एकूण कठीणच बाब आहे. अशा वेळी शेतीपूरक व्यवसायाची जोड आवश्यक आहे. भाजीपाला, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन यासह अन्य लहान-मोठे उद्योग, व्यवसाय आवश्यक असल्याची माहिती कृषी तज्ज्ञांनी दिली.
शेतीमध्ये पारंपरिक पिकांसोबतच प्रगत कृषी तंत्राचा वापर तसेच शेतीपूरक व्यवसायाची जोड आवश्यक आहे. शासनाच्या विविध योजनांच्या साहाय्याने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावू शकते. - प्रवीण राऊत, कृषितज्ज्ञ
अमरावती जिल्ह्यातील शेतकरी
अनुसूचित जाती शेतकरी - ५१६८६
अनुसूचित जमाती शेतकरी - ३२३९१
सर्वसाधारण शेतकरी - ३८६१२८
जिल्ह्यातील शेतकरी - ४७०२०५
अमरावती जिल्ह्याची स्थिती
२६% कमाल भूधारक - १२०३४१
४०% अत्यल्प भूधारक - १८८७५६
३४% अल्प भूधारक शेतकरी - १६११०८
हेही वाचा - शेळीपालनातून आधुनिक स्मार्ट पद्धतीने अधिकचा नफा मिळविण्याचे तीन मार्ग