Join us

Agriculture Scheme : शेतकऱ्यांनो बँक खात्यात आलाय पीक विमा  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2024 11:47 AM

Agriculture Scheme : शेतकऱ्यांना मागील खरीपातील पीक विमा भरपाई आता खात्यात जमा होणार आहे.

शिरीष शिंदे

Agriculture Scheme : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंददायी वार्ता आहे. खरीप-२०२३ मध्ये नैसर्गिक आपत्तीमधील पीक विमा भरपाई म्हणून ९० हजार ८०८ शेतकऱ्यांना ५५ कोटी ४९ लाख रुपये पीक विमा कंपनीने मंजूर केले आहेत. त्यानुसार आतापर्यंत बीड जिल्ह्यातील ५५ हजार ५६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ४८ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. उर्वरित ६ कोटी रुपये वेगाने जमा करण्याचे काम सुरू आहे.

राज्य शासनाने भारतीय कृषी विमा कंपनीची निवड बीड जिल्ह्यासाठी केली आहे. मागील खरीप हंगामात शेतकऱ्यांनी १ रुपया भरून विविध पिकांसाठी पीक विमा भरून आपले पीक संरक्षित केले होते. दरम्यान, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. त्यावेळी शेतकऱ्यांनी कंपनीला कॉल करून नुकसानीची माहिती दिली होती. 

त्यानंतर पुढे नुकसानीचे पंचनामे ठिकठिकाणी करण्यात आले; परंतु वेळेवर पीक विमा रक्कम मिळाली नव्हती. यामध्ये पालकमंत्री तथा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी लक्ष घातले. पीकविमा कंपनीस विमा नुकसान भरपाई देण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आतापर्यंत मंजूर असलेल्या ५५ कोटी ४९ लाख रुपयांपैकी ४८ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी पद्धतीने जमा होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

काढणी पश्चातचाही मिळणार विमा

■ काढणी पश्चात ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांनासुद्धा विमा रक्कम मिळणार आहे.■ काढणी पश्चात झालेल्या नुकसानग्रस्त १०२२ शेतकऱ्यांना ९६ लाख रुपये विमा त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये विमा रक्कम खात्यावर जमा होईल, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सर्व्हर डाऊनमुळे शेतकऱ्यांत गोंधळ

शेतकऱ्यांनी पीक विमा भरताना आपले ज्या बँकेत खाते आहे त्या बँक खात्याचा क्रमांक दिला होता; परंतु सध्या काही बँकांचे सर्व्हर डाऊन आहे. काही शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पीक विमा नुकसानभरपाईची रक्कम जमा झाले असल्याचे मेसेज येत आहेत. बँकेत गेले असता सर्व्हर डाऊन झाले असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण पाहावयास मिळत आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाशेतकरीशेती