Join us

वाढत्या उष्णतेने शेतकऱ्यांनी केला कामांच्या वेळेत बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 9:45 AM

वाढत्या उष्णतेने अंगाची लाहीलाही होत आहे. घामाच्या धारेने अंग चिपचिपत आहे. दुपारचे बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. उष्णतेचा आरोग्यावर परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांनी शेतातील कामाच्या वेळेत बदल केल्याचे चित्र शिवारात दिसत आहे.

वाढत्या उष्णतेने अंगाची लाहीलाही होत आहे. घामाच्या धारेने अंग चिपचिपत आहे. दुपारचे बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. उष्णतेचा आरोग्यावर परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांनी शेतातील कामाच्या वेळेत बदल केल्याचे चित्र शिवारात दिसत आहे.

एरवी कामाच्या घाईमुळे माणसाने फुललेल्या शिवारात १२ वाजेनंतर शुकशुकाट दिसून येत आहे. दुपारच्या सत्रात अंघोळीसाठी नदी व विहिरींवर गर्दी दिसत आहे. उष्णतेमुळे जमिनीची धूप वाढल्याने त्याचा परिणाम शेती पिकांवर होत आहे.

यंदा उष्णतेच्या लाटेचा परिणाम ग्रामीण भागातील जनजीवनावर झालेला दिसून येत आहे. यंदा फेब्रुवारी मध्यापासून गर्मीला सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी महिना संपण्यापूर्वीच पारा ३८ अंशांपर्यंत गेल्याने उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत.

दुपारनंतर तापमानात वाढ होत असल्याने नागरिक चांगलेच हैराण होऊन गेले आहेत. दिवसेंदिवस कोल्हापूर जिल्ह्याचा पारा आणखी चढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दुपारी १२ वाजेपासून ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत उन्हाचा तडाखा जाणवत आहे. त्यामुळे शेतातील कामे सकाळी ७ ते ११ आणि दुपारी ३ वाजेनंतर सायंकाळपर्यंत केली जात आहेत.

अधिक वाचा: उन्हाळा वाढतोय जनावरांना पाण्याबरोबर काय द्याल ज्यामुळे टळेल उष्माघात

उन्हाचा तडाखा आणि उष्म्याने अंगातून घाम जात आहे. त्याचा परिणाम आरोग्यावर होत असल्याने शेतमजुरांनी रोजगाराची वेळ बदलली आहे. उष्णता पिकांच्या पोषक वाढीसाठी आवश्यक असली तरी प्रमाणापेक्षा जास्तीच्या उष्णतेने पिकांना जादाचे पाणी द्यावे लागत आहे.

माळामुरडाच्या पिकांना पाणी वेळेत मिळत नसल्याने ती पाण्याअभावी करपत आहेत. उन्हाचा भाजीपाल्यावरसुद्धा परिणाम झाल्याने उत्पादन घटत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. एप्रिल, मे महिन्यांत वळिवाचा पाऊस पडल्याने उष्णतेचा दाह कमी होतो; परंतु गेल्या काही वर्षांपासून वळिवाची हुलकावणी शेतकऱ्यांची चिंता वाढविणारी आहे.

पडेल तेथे पडेल, असा अनुभव वळिवाबाबत शेतकऱ्यांना येत आहे. उन्हामुळे दिवसा पिकांना पाटपाणी देण्यापेक्षा शेतकरी शक्यतो रात्रपाळीने पाणी देत असल्याचे चित्र आहे. उष्णतेने ग्रामीण भागातील जनता हैराण झाल्याने वळिवाच्या प्रतीक्षेकडे डोळे लावून आहे.

उन्हाळा घातक ठरु शकतो• उन्हाच्या तीव्रतेने चक्कर येऊन शेतकऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने चक्कर येऊन मृत्यू होणे ही बाब खूप गंभीर बनली आहे.• शरीरातील घाम जाऊन थकवा आल्याने शेतात काम करत असताना अचानक चक्कर किंवा हृदयविकाराचा झटका येऊन काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.• यामुळे उन्हात रोजगार करणाऱ्या महिलांनी रोजगाराचे वेळापत्रक बदलले आहे.

टॅग्स :शेतकरीशेतीमहिलाकामगारपीकतापमानआरोग्यपाणीपाऊस