Join us

शेतकऱ्यांनो, नुकसान नको असेल तर यंदा सोयाबीन काढणी अन् साठवणूक करताना 'ही' काळजी घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 1:40 PM

सोयाबीनची (Soybean) उगवण क्षमता आणि गुणवत्ता चांगली राहावी यासाठी सोयाबीन काढणी (Soyabean Harvesting) करताना नेमकी काय काळजी घ्यावी आणि साठवणुकीच्या योग्य पद्धती कोणत्या याबद्दल सेंद्रिय शेती अभ्यासक पल्लवी चिंचवडे (Pallavi chinchwade) यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे.

सोयाबीन परिपक्व झाल्यावर काढणी करणे, योग्य यंत्रांचा वापर करून मळणी करणे आणि योग्य पद्वतीने साठवणूक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सोयाबीनची उगवण क्षमता आणि गुणवत्ता चांगली राहावी यासाठी सोयाबीन काढणी करताना नेमकी काय काळजी घ्यावी आणि साठवणुकीच्या योग्य पद्धती कोणत्या याबद्दल सेंद्रिय शेती अभ्यासक पल्लवी चिंचवडे यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे.

सोयाबीन पीक पेरणीनंतर ९५ ते १०५ दिवसांत काढणीसाठी तयार होते. कालावधी वाणानुसार कमी-अधिक होऊ शकतो. सोयाबीनच्या शेंगा परिपक्व झाल्यानंतर लगेचच पिकाची काढणी करणे गरजेचे असते. साधारणपणे शेंगा पिवळ्या झाल्यास काढणी करायला सुरुवात करावी. पेरणी केलेल्या आणि उशिरा परिपक्व होणाऱ्या वाणांसाठी शेंगांच्या रंग बदलानुसार काढणी करावी.

काढणीला उशीर केल्यास शेंगा तडकून १०-१५ टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट येण्याची शक्यता असते. सोयाबीनच्या दाण्यांमध्ये साधारणपणे १४-१५ टक्के ओलावा राहिल्यास काढणीला सुरुवात करावी. पिकाची काढणी करताना धारदार विळा किंवा कोयत्याचा वापर करावा. झाड उपटून येणार नाही याची काळजी घ्यावी.

झाड उपटून आलेच तर मुळांना लागलेली माती झटकून घ्यावी. बऱ्याचदा माती मुळांना लागून मळणी करताना मिसळली जाते आणि गुणवत्ता ढासळते. काढणीनंतर सोयाबीनची गंजी किंवा ढीग लावून ठेवू नये. पीक ओलसर असल्यास बुरशी लागून धान्याची गुणवत्ता ढासळू शकते. काढणीनंतर २-३ दिवसांनी पीक चांगले वाळल्यानंतर छोट्या छोट्या गंजी किंवा ढीग लावून ठेवावे. पावसाचे वातावरण असल्यास सर्व शेतमाल एकत्र करून मोठी गंजी लावून झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी.

ओलावा कमी होईल एवढे ऊन देऊ नये

• सोयाबीनचे पीक चांगले वाळल्यानंतरच मळणी करावी. खरीप हंगामात बियाणे म्हणून वापरायचे असल्यास सोयाबीनमध्ये साधारणपणे १३ ते १४ टक्के आर्द्रता असावी. पीक चांगले कडक वाळलेले असल्यास मळणी यंत्राचा स्पीड साधारण स्पीडपेक्षा कमी ठेवला तरीदेखील चालते, कारण अशा वेळी दाणे फुटण्याची शक्यता अधिक असते. मळणी केल्यानंतर बियाण्यात ओलसरपणा किती आहे त्यानुसार एक किंवा दोन ऊन देऊन साठवणुकीसाठी तयार करावे.

• ओलावा १० टक्क्यांपेक्षा कमी होईल एवढे ऊन देऊ नये कारण ओलावा खूप कमी होऊन वजनात घट येते. बियाणे दाताखाली घेऊन दाबल्यास ते टिचकते यावरून बियाण्यातील ओलावा योग्य असल्याचे समजावे.

साठवणुकीसाठी पोत्यांचा वापर करावा

• साठवणूक करताना सेंद्रिय शेतमाल आणि रासायनिक पद्धतीने उत्पादित केलेला शेतमाल एकत्र मिसळला जाणार नाही याची काळजी घ्यावी. साठवणूक करताना बियाण्यामध्ये १२ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता नसावी. एकावर एक पाच-सहापेक्षा जास्त गोणी किंवा पोती ठेवू नये. पाच-सहापेक्षा अधिक गोणी ठेवल्यास धान्यातील आर्द्रता वाढून सोयाबीनची गुणवत्ता ढासळण्याची शक्यता असते.

• साठवणुकीसाठी शक्य असल्यास बारदान पोत्यांचा वापर करावा. यामुळे हवा खेळती राहून ओलावा वाढत नाही. तसेच साठवणुकीची जागा हवेशीर असावी. जमिनीवर, फरशीवर सोयाबीन गोणी, पोती न ठेवता वाली लाकडी फळ्यांचा वापर करावा.

हेही वाचा : Dragon Fruit Success Story : ड्रॅगन फ्रूट मधून मिळाली उभारी; घर, गाडीसह ओळख मिळाली भारी

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरीसोयाबीनकाढणीबाजार