Join us

शेतकऱ्यांनो, युरिया पाहिजे तर लिक्विड खतेही घ्या; लिकिंगमुळे शेतकरी हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2024 3:12 PM

शेतकऱ्यांना परवडणारे एकमेव रासायनिक खत असलेल्या युरियावर आता लिकिंग सुरू केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. युरिया हवा तर दोनशे रुपये किमतीचे लिक्विड खते घेण्याचा आग्रह विक्रेते करून लागले आहेत. कृषी विभागाची तालुकानिहाय भरारी पथके आहेत, मग ही पथके करतात तरी काय, असा प्रश्न यानिमित्ताने शेतकरी करू लागले आहेत.

कोल्हापूर : शेतकऱ्यांना परवडणारे एकमेव रासायनिक खत असलेल्या युरियावर आता लिकिंग सुरू केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. युरिया हवा तर दोनशे रुपये किमतीचे लिक्विड खते घेण्याचा आग्रह विक्रेते करून लागले आहेत. कृषी विभागाची तालुकानिहाय भरारी पथके आहेत, मग ही पथके करतात तरी काय, असा प्रश्न शेतकरी करू लागले आहेत.

रासायनिक खतांच्या किमती आवाक्याच्या बाहेर गेल्याने शेतकरी अडचणीत आहे. केंद्र सरकारने रासायनिक खतांवरील अनुदान कमी केल्याने दर वाढले आहेत. युरिया हे एकमेव खत शेतकऱ्यांच्या आवाक्यात राहिले आहे. युरिया २६६ रुपये विक्री दर आहे; पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात कोठे २७० तर कोठे २७५ रुपयांना पडतो.

मात्र, यातही सध्या काही तालुक्यात युरियावर लिकिंग दिले जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. विशेष म्हणजे खासगी विक्रेत्यांसह सहकारी संघाच्या दुकानातही शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. २६६ रुपयांचा युरिया हवा असेल तर किमान दोनशे रुपयांची लिक्विड खत घेण्याची सक्ती विक्रेते शेतकऱ्यांना करू लागले आहेत.

युरियावरील लिकिंगबाबत आमच्याकडे तक्रारी आलेल्या नाहीत. तसे प्रकार सुरू असतील तर तातडीने भरारी पथकाना आदेश देऊ, लिकिंग करणाऱ्यांचा परवाना रद्द केला जाईल. - अजयकुमार चव्हाण (जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर).

महापुराने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना आता खतविक्रेतेही वेठीस धरू लागले आहेत. युरियाच्या दराएवढेच लिकिंग शेतकऱ्यांच्या माथी मारले जात आहे. खासगी विक्रेत्यांसह सहकारी संघातही हा प्रकार घडत असताना कृषी विभाग नुसता बघ्याची भूमिका घेत आहे.- दादासाहेब पाटील भडगावकर (शेतकरी, म्हाकवे).

हेही वाचा -  Farmer Success Story उच्चशिक्षित पती-पत्नीने फळबाग शेतीतून शोधला 'प्रगती'चा मार्ग

टॅग्स :शेती क्षेत्रखतेशेतीशेतकरीकोल्हापूर