नवनाथ जगदाळे
दहिवडी : कांद्याचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेले आणि प्रगतशील शेतकऱ्यांचे गाव म्हणून ओळख असलेल्या बिदालमधील शेतकरी आता पारंपरिक शेतीला फाटा देत फळबागेकडे वळलेला दिसत आहे.
निसर्गाची अनेकवेळा अवकृपा, शेतमालाला हमीभाव नसल्याने खात्रीशीर उत्पन्न म्हणून फळबागेकडे पाहिले जाते. कष्ट करण्याची तयारी असणाऱ्या बिदालमध्ये कांद्याप्रमाणेच मोठ्या प्रमाणात डाळिंबीच्या बागा होत्या. जवळपास ३०० हेक्टरवर डाळिंब होते. परंतु, तेल्या रोगामुळे मोजक्याच बागा शिल्लक राहिल्या होत्या.
त्यानंतर बिदालकरांनी पुन्हा शेतामध्ये प्रयोग राबवायला सुरुवात केली. गोविंदराव जगदाळे व मोहन जगदाळे यांनी तैवान पेरूची लागवड करून विक्रमी उत्पादन घेतले. डॉ. बाळासाहेब इंगवले यांनी सीताफळाची शेती केली.
रामभाऊ चिरमे यांच्यानंतर अनिल पाटील यांनी द्राक्षांचे विक्रमी उत्पादन घेतले, चांगदेव चिरमे यांच्या प्रेरणेतून पोपट ढोक, धनंजय जगदाळे, मोहन कुलाळ यांनी ड्रॅगनफ्रूटची लागवड केली. कुलाळ यांच्या बागेचा तोडा झाला असून, २१५ रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला.
एकेकाळी प्रेरणेतून पोपट ढोक, धनंजय जगदाळे, मोहन कुलाळ यांनी ड्रॅगनफ्रूटची लागवड केली. कुलाळ यांच्या बागेचा तोडा झाला असून, २१५ रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला. एकेकाळी पिकवणारे अशोक इंगवले यांनी भगवा जातीची रोपे महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशपर्यंत पुरवली.
केळामध्ये परंपरागत असणाऱ्या चिरमे परिवारानेही केळीमध्ये विक्रमी उत्पादन घेतले होते. संत्री, सफरचंद या फळबागेचीही लागवड काही शेतकऱ्यांनी केली आहे.
याशिवाय प्रताप भोसले यांची सीताफळ, पेरू, आंबा, जांभूळ, लक्ष्मण बोराटे यांची आंबा, सीताफळ, तर संजय गांधी यांची ५ एकर नारळाची बाग आहे. मजुरांची तोकडी उपलब्धता, हवामानात होणारे बदल यामुळे फळबागेशिवाय पर्याय राहिला नसल्याचे शेतकरी सांगतात.
बिदाल गावात नेहमीच शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग राबवले जातात. काहीतरी नवीन शिकण्याची जिद्द आहे. या गावाला शेतीचा मोठा इतिहास आहे, येथील राऊत बंधूंनी वरलक्ष्मी कापसाची जात, तर भोसले यांनी उसाची व्हरायटी विकसित केली होती. ती प्रेरणा आजही आमच्या मनामनात आहे. - संजय गांधी, प्रगतशील शेतकरी, बिदाल