जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील दाभाडी हे सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले गाव म्हणून ओळखले जाते. येथील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पेरणीची पूर्ण तयारी केली असून, कडधान्य पेरणीकडे सर्वाधिक शेतकऱ्यांचा कल आहे. विशेष करून सोयाबीन, मका, मूग, उडीद, बाजरी यासारख्या कडधान्याची जास्त मागणी केली जात आहे.
रब्बी हंगामातील अगदी कमी खर्चात, कमी कालावधीत आणि कमी पाण्यावर मूग, उडीद, बाजरी, सोयाबीन, मका ही पिके येतात. त्यासाठी खते, औषध फवारणी, निंदणासाठी लागणारा खर्चदेखील मर्यादित असतो.
त्यामुळे ऐनवेळी बाजारात या कडधान्यास भाव कमी- जास्त झाले तरी, शेतकऱ्यांना त्याचा जास्त फटका सहन करावा लागत नाही. अशी शेतकरी वर्गात भावना आहे. त्याऐवजी कपाशीची लागवड केल्यास लागवडीपासून ते विचणीपर्यंत कपाशीवर मोठा खर्च करावा लागतो.
यातच कापसाला हवा तसा भाव मिळत नाही. यामुळे अनेकवेळा शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. यंदा कापसाला चांगला भाव मिळेल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पेरणीपर्यंत कापूस घरात ठेवला होता.
तरीदेखील कापसाला समाधानकारक दर मिळाला नसल्याने खरीप हंगामाच्या खते, बी- बियाणांसाठी पैसे नसल्याने घरात ठेवलेला कापूस बेभावाने विक्री करावा लागला आहे.
मागील वर्षे कापसाला समाधानकारक भाव नसल्याने यंदा कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. तूर, बाजरी, मूग, उडीद सर्व मिळून अंदाजे ११० हेक्टर पेरणी होईल, असा कृषी विभागाकडून अंदाज वर्तविला जात आहे.
शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे घेताना कुठलीही अडचण आल्यास कृषी विभागाच्या वतीने तालुक्याच्या ठिकाणी तक्रार केंद्र सुरू केले आहेत. त्या केंद्रांशी संपर्क साधावा. परंतु, त्यापूर्वी शेतकऱ्यांनी कुठल्याही दुकानातून बी-बियाण्यांची खरेदी करताना किंवा खते घेताना दुकानदाराकडे पक्के बिल पावती हक्काने मागितली पाहिजे. त्याशिवाय शेतकऱ्यांची फसवणूक केलेल्या समोरच्या दुकानदारावर कारवाई करता येणार नाही.
त्यामुळे दुकानदार हा ओळखीचा असला तरी, पक्के बिल घ्या, छापील किमतीनुसार पैसे द्या, सध्या बाजारात कुठेही बी-बियाण्यांचा तुटवडा नाही किंवा खतांची कमतरता नाही. कुणीही कृत्रिम टंचाई निर्माण करत असेल तर कृषी विभागाशी संपर्क करा. - महादेव भटे, कृषी सहायक, दाभाडी.
हेही वाचा - Conch Snail Control शंखी गोगलगायीचे नियंत्रण करण्याची सोपी पध्दत