पुरंदर तालुक्यातील दिवे परिसरात फळबागांबरोबरच तरकारी भाजीपाल्यांचे उत्पादन घेतले जाते, यात फ्लॉवर पिकाचे दोन्ही हंगामात दर्जेदार उत्पादन घेतले जाते. परंतु यावर्षी सुरुवातीला दुष्काळी परिस्थिती, लांबलेला पाऊस यामुळे फ्लॉवर उत्पादनात घट झाली आहे.
मात्र, अशाही परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी पुरंदर उपसा जलसिंचन योजना, शेततळी, तसेच आपल्या बोअरवेलच्या उपलब्ध पाणी साठ्यावर फ्लॉवरचे दर्जेदार उत्पादन घेतले आहे. यासाठी मे महिन्याच्या सुरुवातीला कडक उन्हाळ्यात नितीन टिळेकर, पांडुरंग गायकवाड, मनोज झेंडे अशा काही शेतकऱ्यांनी फ्लॉवरची यशस्वी लागवड केली आहे.
सुरुवातीलाच भरपूर शेणखत, गरजेपुरता रासायनिक खतांचा वापर करून नर्सरीमधून तयार रोपे मागवून रोपांची लागवड केली. कडक उन्हाळा असल्याने पाण्याचे वेळेवर योग्य नियोजन करून, वेळेवर औषधफवारणी करून आपले फ्लॉवर पीक कडक उन्हाळ्यात वाचवले.
सध्या फ्लॉवरची काढणी सुरू असून, किलोला तब्बल पस्तीस रुपये बाजारभाव मिळत आहे. गट्टा खराब होऊ नये म्हणून संपूर्ण पाल्यासकट फ्लॉवर बाजारात पाठवला जातोय. सर्वच भाजीपाल्यांचे भाव वाढले आहेत. फ्लॉवरलादेखील बाजारात चांगली मागणी आहे. किरकोळ बाजारात फ्लॉवर शंभर रुपये किलोच्या पुढे विकला जात आहे.
पाच हजार फ्लॉवरच्या कलमांची लागवडदिवे येथील प्रगतीशील शेतकरी नितीन टिळेकर व रेश्मा टिळेकर या दाम्पत्याने आपल्या तीस गुंठे क्षेत्रावर सीताफळ बागेत आंतरपीक म्हणून पाच हजार फ्लॉवरच्या कलमांची लागवड केली होती. या दाम्पत्याला आतापर्यंत तब्बल पन्नास हजार रुपये उत्पन्न मिळाले असून, अजून तीस ते पस्तीस हजार रुपये उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे.