समर्थ भांड
मागील वर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने दुष्काळी सावटाखाली असलेल्या बीड जिल्ह्यातील सात तालुक्यांतील शेतकऱ्यांना वीज बिलात सवलत मिळणार आहे. यामुळे सात तालुक्यांतील एकूण १६ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे.
मागील वर्षी अनेक गावांत व तालुक्यांत ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील १६ महसूल मंडळांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. बीड, पाटोदा, आष्टी, माजलगाव, केज, परळी, शिरुर कासार या तालुक्यांतील १६ महसूल मंडळ या सवलतीसाठी पात्र आहेत. दरम्यान, जिल्ह्यात एकूण कृषीपंपधारक शेतकऱ्यांची संख्या १ कोटी ८५ लाख ९३ हजार एवढी आहे.
३३.५ टक्के सवलत
■ दुष्काळी परिस्थितीचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांना वीज बिलात सवलत दिली जात आहे.
■ शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के एवढी सवलत दिली जात आहे.
■ तसेच जिल्ह्यातील या महसूल मंडळांतील वीजदेखील खंडित केली जाणार नाही.
■ वीजबिल सवलतींसह शेतकऱ्यांना अनेक सुविधा जाहीर केल्या आहेत.
बीड जिल्ह्यातील तालुका निहाय महसूल मंडलात बीड ५, पाटोदा १, आष्टी ३, माजलगाव १, केज २, परळी १, शिरूर कासार ३ अशी एकूण १६ मंडळे सामील आहेत.