Join us

दुबार पेरणीने महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत; राज्यात केवळ ५९ टक्केच पेरण्या

By नितीन चौधरी | Published: July 15, 2023 10:24 AM

राज्यात आतापर्यंत केवळ ५९ टक्केच पेरण्या झाल्या असल्याने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, तसेच विदर्भातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

राज्यात मुळातच मान्सून उशिरा दाखल झाल्याने पेरण्यांनाही उशीर झाला. पेरण्या झाल्यानंतरही त्या भागात पुरेसा पाऊस न झाल्याने मराठवाडा, खान्देश व पश्चिम विदर्भासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी दुबार पेरणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बियाण्यांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात आतापर्यंत केवळ ५९ टक्केच पेरण्या झाल्या असल्याने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, तसेच विदर्भातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

राज्यात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात आलेल्या मान्सूनने सर्वदूर हजेरी जरूर लावली. मात्र, त्यात जोर नसल्याने शेतामध्ये पुरेसा ओलावा तयार झाला नव्हता. पेरणीला उशीर होईल या भीतीपोटी शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, पण त्यानंतर किरकोळ पाऊस झाला. त्यातच प्रखर उन्हामुळे रोपे कोमेजली. पावसात खंड पडल्याने सोयाबीन, कपाशी, तूर, मका, भात या पिकांची आता दुबार पेरणीची वेळ आली आहे. जळगाव, धुळे, नंदूरबार, बुलढाणा, वाशिम, पुणे, सातारा, परभणी, हिंगोली, औरंगाबाद, नगर, अकोला वर्धा अशा बहुतांश जिल्ह्यांत ही परिस्थिती थोड्याफार फरकाने आहे.

राज्यात ६३ तालुक्यांत २५ ते ५० टक्के पाऊस झाला आहे. १४५ तालुक्यांत ५० ते ७५ टक्के, तर ९७ तालुक्यांत ७५ ते १०० टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर सरासरीपेक्षा अर्थात १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झालेल्या तालुक्यांची संख्या ५० आहे. मात्र अनेक ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दुबार पेरणीसाठी आता पुन्हा नव्याने बियाण्याची जुळवाजुळव करावी लागत आहे. 

बाजारात बियाणे उपलब्ध असल्यास अडचण येणार नाही. मात्र, सारखीच आहे. त्यामुळे शेतकरी सोयाबीन वगळता कपाशी, तूर, मका या बियाण्यांचा तुटवडा जाणवण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यातून काळाबाजार होण्याचाही अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत. त्यामुळे कृषी विभागाने यावर आतापासूनच अंकुश लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.  

गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पाऊस होत आहे. मात्र, तो सर्वदूर नाही. स्थानिक परिस्थितीमुळे तयार झालेल्या पावसामुळे ठरावीक ठिकाणीच पाऊस पडत आहे.

टॅग्स :खरीपपेरणीमोसमी पाऊसलागवड, मशागत