यंदा सर्वत्र अवकाळी पावसाने रब्बीच्या पिकांना जीवदान दिले. आता ग्रामीण भागात ज्वारीची काढणी व बांधणीची कामे सुरू आहेत. अशातच दोन दिवसांपासून आभाळाने रंग बदलला. राज्यातील काही ठिकाणी, तर गारपीटही झाली आहे. गारपिटीच्या धास्तीने शेतकऱ्यांची खळे उरकण्याची धांदलघाई सुरू आहे. कडबा भिजून चाऱ्याचे नुकसान होऊ नये, यासाठी कडबा गंजीला लावण्याची लगबग सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
यावर्षी पावसाने सुरुवातीपासूनच धरसोड केली. त्यामुळे खरीप हंगाम तसाच गेला. तर रब्बी हंगामात ज्वारी, हरभरा या पिकांना पाणी कमी लागते म्हणून शेतकऱ्यांनी या पिकांना पसंती दिली; मात्र पुन्हा पावसाने ओढ दिल्याने रब्बी हंगामदेखील हातचा जातोय का, अशी शेतकऱ्यांनी भीती होती. अशातच अवकाळीने हजेरी लावली आणि हाच अवकाळी पिकाला जीवदान देणारा ठरला. ज्वारीचे पीक समाधानकारक आले. रोगाला बळी पडू नये म्हणून औषधी फवारणी केली. आता जवळपास काढणीचे काम आटोपले.
मात्र दोन दिवसांपासून परत आभाळाने रंग बदलला. सोमवारी मेघगर्जना होत हलक्या सरी कोसळल्या. काही जिल्ह्यात गारपीट झाल्याने शेतकरी खळे करण्याची गडबड करीत आहेत. कडबादेखील गंजीला लावण्याची घाई दिसत आहे.
मळणी यंत्रचालकांची सुरु झाली लगीनघाई
गारपिटीच्या धास्तीने प्रत्येक शेतकऱ्याला आपली ज्वारी, गहू वेळेत घरी गेला पाहिजे, असे वाटतं. त्यामुळे सर्वजण एकदाच मळणी यंत्रचालकांच्या मागे लागले आहेत. त्यामुळे मळणी यंत्रचालकांची लगीनघाई सुरू आहे. अशातच ज्या भागात लाइट असेल त्या भागात मळणी यंत्रचालकाला जावे लागते. आठ दिवसांपासून रात्रंदिवस मळणी यंत्र सुरु असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
मजुर पुन्हा खातोय भाव
गहू, ज्वारी, हरभरा काढतांना अनेकांना मजुरांची गरज भासत आहे. सगळीकडे सोबत मागणी असल्याने सध्या मजुरांनी आपले रोजंदारी दर वाढवले असून मजूर पुन्हा खातोय भाव अशी चर्चा गावागावात सुरू आहे.