कांद्यासाठी साडेतीनशे रुपये प्रतिक्विंटल जाहीर झालेल्या अनुदानापासून अपात्र राहणाऱ्या बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांनाही अनुदान देण्याबाबत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सकारात्मक निर्णय घेतला असून, याबाबत कृषी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव यांना निर्देश देत अपात्र शेतकऱ्यांनाही अनुदान देण्याची कार्यवाही करण्यास त्यांनी सूचित केले. यामुळे तालुक्यातील कांदा अनुदानापासून अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार दिलासा मिळणार आहे.
आमदार दिलीप बोरसे यांनी गुरुवारी (दि.३) मुंडे यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. राज्य शासनाने २०२२-२३ या वर्षात कांदा अनुदान योजना जाहीर केली होती. योजनेसाठी शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे प्रस्ताव दाखल केले. परंतु पिकाच्या सरासरी एकरी उत्पन्न मर्यादा ही ९० क्विंटल प्रति एकर असा दाखला कृषी विभागाने दिला. शेतकरी प्रत्यक्षात २०० ते २५० क्विंटलपर्यंत कांदा पिकाचे एका एकरात उत्पादन घेतात.
अनुदानाचा लाभ घेण्यासाठी बाजार समितीत प्रस्ताव जमा केले. प्रस्ताव छाननी करत असताना लेखापरीक्षकांनी ज्या शेतकऱ्यांनी एकरी उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त कांदा विक्रीच्या पावत्या जोडल्या होत्या, त्या शेतकऱ्यांना अनुदानासाठी अपात्र ठरविले आहे. त्यामुळे शेतकरी कांदा अनुदानापासून वंचित राहणार आहेत.