निसर्ग संवर्धनासाठी मारुंजी येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 'झाडी पाडवा' साजरा करण्यात आला. गुढी उभारण्यासाठी बांबूच्या झाडांची तोड न करता झाडांवरच गुढी उभारली.
हिंजवडी आयटी पार्कलगत असलेल्या मारुंजीमध्ये सुमारे दोनशे एकर वनक्षेत्र आहे. मात्र, दरवर्षी उन्हाळ्यामध्ये वणवे लागून जंगल भस्मसात होते. गुढीपाडव्यासाठी अनेक व्यापारी येथील बांबू वृक्षांची बेकायदेशीर तोड करतात.
त्यामुळे ही तोड होऊ न देता वृक्षांवर गुढी उभारण्याचा निर्णय शेतकरी अंकुश जगताप यांनी घेतला. जुन्या पिढीतील कोंडाबाई जगताप यांच्या हस्ते आंब्यांच्या रोपाची लागवड केली. वृत्तपत्र विक्रेते तानाजी गायकवाड यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी मांगीलाल देवासी, हेमंत देवासी उपस्थित होते. शेतकरी अंकुश जगताप म्हणाले," जंगलतोड बेसुमार वाढली आहे. यावर्षी दुष्काळ व चाळीस अंशापेक्षा जास्त तापमान झाले आहे.
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी 'झाडी पाडवा' उपक्रम हाती घेतला आहे.