महिन्यामागून महिने निघून चालले; मात्र ऊस उत्पादकांचे साखर कारखानदार पैसे काही देत नाहीत. ६३१ कोटी रुपये थकीत आहेत. साखर आयुक्तांनी म्हणल्याप्रमाणे शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत.
सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादकांचे पैसे थकविणाऱ्या १७ साखर कारखान्यांना १८ मार्च रोजी साखर आयुक्त कार्यालयात सुनावणीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.
या अगोदर १३ फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीवेळी शेतकऱ्यांचे पैसे देतो अशी लेखी देणाऱ्या साखर कारखान्यांनी दिलेला शब्द पाळला नसल्याने साखर आयुक्तांनी पुन्हा नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील साखर हंगाम यंदा फेब्रुवारीत आटोपला. त्यानंतर १५ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणे अपेक्षित होते. मात्र साखर कारखानदार इकडे शेतकऱ्यांचे पैसे देत नाहीत व तिकडे ऊस उत्पादकांचे पैसे देतो असे सुनावणीवेळी लिहून देतात.
सोलापूर प्रादेशिक साखर सहसंचालक प्रकाश अष्टेकर यांनी एफआरपी देण्यासाठी साखर कारखान्यांना नोटिसा दिल्या होत्या. साखर कारखानदार जुमानत नसल्याने तत्कालीन साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी १३ फेब्रुवारी यांनी सुनावणी घेतली होती.
त्यानंतर सिद्धेश्वर कुमठे, श्री. पांडुरंग श्रीपूर, युटोपियन, अवताडे शुगर, लोकनेते बाबुरावआण्णा पाटील व बबनराव शिंदे तुर्क पिंपरी या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे दिल्याचे दिसत आहे.
१८ मार्च रोजी साखर नवे साखर आयुक्त सिद्धाराम सालिमठ यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील १३ व धाराशिव जिल्ह्यातील चार अशा १७ साखर कारखान्यांची एफआरपी देण्यासाठी सुनावणी होणार आहे.
सावंतांच्या सहा कारखान्यांकडे थकबाकी
भूम-परांड्याचे आमदार व माजी मंत्री तानाजी सावंत व सावंत बंधूच्या भैरवनाथ आलेगाव, भैरवनाथ लवंगी, भैरवनाथ वाशी, भैरवनाथ तेरखेडा व भैरवनाथ सोनारी या साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे पैसे अडकले आहेत. माढ्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या चारही साखर कारखान्यांकडे आयुक्तांकडील माहितीनुसार एफआरपीची रक्कम पेंडिंग दिसत नाही.
यांना बजावल्या नोटिसा
- सिद्धनाथ शुगर तिर्हे, लोकमंगल बीबीदारफळ, लोकमंगल भंडारकवठे, जकराया शुगर, भैरवनाथ लवंगी, भैरवनाथ आलेगाव, इंद्रेश्वर बार्शी, धाराशिव (सांगोला), येडेश्वरी बार्शी, मातोश्री अक्कलकोट, संत दामाजी, जय हिंद, गोकूळ (सर्व सोलापूर), भैरवनाथ वाशी, भैरवनाथ तेरखेडा, भैरवनाथ सोनारी व भीमाशंकर पारगाव या साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी नोटिसा बजावल्या आहेत.
- २८ फेब्रुवारीपर्यंत सोलापूर २ जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे ५३४ लाख रुपये व धाराशिव जिल्ह्यातील कारखान्यांकडे २६ कोटी ५० लाख अशी सोलापूर प्रादेशिक विभागातील कारखान्यांकडे ६३० कोटी ३९ लाख रुपये एफआरपीचे अडकले आहेत.
अधिक वाचा: उसाला १८ महिने सांभाळण्यापेक्षा एका वर्षात या पिकाचे पैसे शेतकऱ्यांच्या हातात; वाचा सविस्तर