लक्ष्मण सरगरआटपाडी: पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये माळरानावर कमी पाण्यात येणाऱ्या डाळिंब पिकाची माहिती घेऊन आपल्या राज्यात त्याची लागवड करण्याच्या उद्देशाने थेट आसाम राज्यातून डाळिंबाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आटपाडीला दोन शेतकऱ्यांनी भेट देत अभ्यास केला.
आसाम व अरुणाचल राज्याच्या सीमेवरील बालिजुरी गावातून थेट तीन हजार किलोमीटरवरून रंजन रामाचार्य व बायजू कुमार रामाचार्य या दोन शेतकऱ्यांनी आटपाडीचे डाळिंब क्षेत्रातील कृषितज्ज्ञ असलेले अक्षय सागर यांच्या सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहत थेट आटपाडी गाठले.
दोन दिवस चाळीसहून अधिक डाळिंब बागांना भेटी देत लागवड, औषध फवारणी, खते, छाटणी, फळ धारणा यासह हार्वेस्टिंग अन्य बाबींचा अभ्यास करून गुटी कलम घेऊन आसामला एक हेक्टर डाळिंब लागवड करण्याचेच त्यांनी मानस व्यक्त केला आहे.
आसामवरून डाळिंब शेती विषयीची उत्सुकता व शेतीमध्ये नावीन्याचा ध्यास घेत शेतीमध्ये बदल घडविण्याच्या जिद्दीने आलेले शेतकरी डाळिंब शेतीच्या बागा पाहून आश्चर्यचकित झाले. दरम्यान रामाचारी या शेतकऱ्यांची एकूण ४० एकर शेती असून या ४० एकर शेतीमध्ये त्यांनी ड्रॅगन फूड अॅपल बोर कलिंगड सुपारी यांची २० एकर शेती केली आहे.
त्यांच्या आसाम राज्यामध्ये पारंपरिक असणारी चहा शेती रबर शेतीला त्यांनी बगल देत शेतीमध्ये वेगळे आणि यशस्वी प्रयोग राबविले आहेत. आसाम हा प्रदेश पर्जन्यछायेचा आहे.
सध्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे पाऊस कमी पडत आहे. त्यामुळे डाळिंब हे पीक कमी पावसाच्या प्रदेशांमध्ये उत्तमरीत्या येते व आर्थिक मोबदला त्यातून चांगल्या प्रकारे मिळत असल्याने पर्जन्यछायेच्या प्रदेशात आटपाडी सारख्या दुष्काळी भागात डाळिंब पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुष्काळी भागातील डाळिंब शेतीची माहिती घेण्यासाठी त्यांनी थेट आटपाडी गाठले असून कृषितज्ज्ञ अक्षय सागर यांच्या माध्यमातून त्यांनी विविध भागांना भेटी दिल्या.
शेतकऱ्यांच्याकडून डाळिंब बागेविषयी माहिती करून घेतली आहे. डाळिंब पीक हे सध्या मोठ्या संकटात आहे. मात्र त्याकडे शासनाने कानाडोळा केला आहे. असे असूनही आसामसारख्या राज्यातून डाळिंब लागवडीची माहिती घेऊन त्यांच्या राज्यामध्ये शेतीमध्ये बदल करण्याचा मानस शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
सध्या आसाममध्ये जागतिक तापमानवाढीने मोठा बदल झाला आहे. कमी पावसामुळे इतर शेती करणे अवघड झाले आहे. यासाठी आम्ही शेतीमध्ये वेगळे प्रयोग केले आहेत. डाळिंबाविषयीची माहिती आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून अक्षय सागर यांच्याकडून मिळाली होती. मात्र प्रत्यक्षात डाळिंब शेतीला भेट देण्यासाठी आम्ही आटपाडी तालुक्यातील विविध डाळिंब बागांना भेटी दिल्या. आम्ही आमच्या प्रदेशाकडे जाऊन किमान एक हेक्टरवर डाळिंबाची लागवड करणार आहोत. - रंजन रामाचार्य व बायजू कुमार रामाचार्य, शेतकरी, बालिजुरी आसाम
आसामवरून आलेले रंजन रामाचार्य व बायजू कुमार रामाचार्य यांची ओळख नसताना त्यांनी तीन हजार किलोमीटरचा प्रवास करून डाळिंब बागेविषयी माहिती घेतली. त्यांना डाळिंब लागवडीसाठी मदत करणार आहे. - अक्षय सागर, कृषितज्ज्ञ
अधिक वाचा: बाजारपेठेच्या अभ्यासानुसार लिंबू फळपिकात कसा धरावा बहार