मुरबाड : शेतकरी हे काबाडकष्ट करून भाजीपाला पिकवतात, मात्र कीटकनाशकामुळे त्यांचे मोठे नुकसान होते. ते टाळण्यासाठी कृषी विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पाटगाव येथे आदिवासी शेतकऱ्यांना भाजीपाल्यावर कीटकनाशकाची फवारणी करण्यासाठी ड्रोनचे प्रात्यक्षिक दाखवले. आदिवासींना कीटकनाशक देण्यात आले.
मुरबाड तालुक्यातील अनेक शेतकरी हे शेतीबरोबर बारमाही भाजीपाल्याची लागवड करतात. परंतु त्याची चांगल्याप्रकारे वाढ व्हावी व मिळणाऱ्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खत दिले जाते. मात्र या भाजीपाल्यावर अनेक प्रकारच्या किटकांचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकऱ्याने पिकविलेला भाजीपाला नष्ट होतो. यासाठी शेतकरी मित्र दत्तात्रय डोंगरे यांनी परिसरातील शेतकऱ्यांची समस्या आमदार कथोरे यांच्या समोर मांडली.
त्यांनी कृषी अधिकाऱ्यांसमवेत मेळावा घेतला, पाटगावमधील शेतकऱ्यांनी पिकविलेल्या काकडी, घोसाळी, दुधी, शिराळ व कारली तसेच भेंडीवर किटकांचा होणारा प्रादुर्भाव समूळ नष्ट करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर ड्रोनच्या मदतीने फवारणी केली.
यामध्ये शेतकऱ्यांना फायदा होईल. फवारणीसाठी लागणारे मनुष्यबळ, मजुरी यांची बचत होईल. कीटकनाशक ही कृषी विभागामार्फत मोफत मिळणार आहे, ज्या शेतकऱ्यांना ड्रोनची खरेदी करायची आहे त्यांना सरकारकडून अनुदान दिले जात असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय खोब्रागडे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांसाठी योग्य संधी
दरम्यान ड्रोनच्या या वापरामुळे मुरबाड मधील शेतकयांना भविष्यात शेतीबरोबर भाजीपाला लागवड हा जोडधंदा करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानामुळे संधी मिळत असल्याचे तालुका कृषी अधिकारी नामदेव धांडे व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक गोकुळ जाधव यांनी सांगितले. यावेळी ड्रोन पायलट विशाल पवार, दत्तात्रय डोंगरे, जनार्दन पादिर, माजी सभापती दीपक पवार उपस्थित होते.