शेतकऱ्यांना आता वैयक्तिक शेततळ्यासाठी अनुदानाचा अर्ज करता येणार आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्रसरकारच्या संकेतस्थळावर अर्ज पुन्हा सुरू झालेले असून शेतकऱ्यांनी लवकरात लवकर यासाठी अर्ज करावा असे आवाहन कृषी विभागांमार्फत करण्यात आले आहे.
राज्यातील कोरडवाहू, खडकाळ जमीन असणाऱ्या बहुतांश शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता नसल्यामुळे पावसावर अवलंबून राहावे लागते. परिणामी अपुऱ्या पाण्याअभावी उत्पन्न घटते. यासाठी शेततळ्याला पर्याय म्हणून शेतकरी पाहतात. 'मागेल त्याला शेततळे' योजनेअंतर्गत शेतकऱ्याला यासाठी अर्ज करता येणार आहे.
शेतकऱ्यांना सिंचनाची सोय निर्माण करून देणारी शेततळे योजनेमधून शेतकऱ्यांना अनुदान मिळते. यासाठी राज्य शासनाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक असते.
किती मिळते अनुदान?
वैयक्तिक शेततळे तसेच सिंचन साधने व उपकरणांसाठी शेततळ्याच्या आकारमानावरून अनुदान ठरवले जाते. ही रक्कम पूर्वी पन्नास हजार एवढी होती. यावर्षी या अनुदानामध्ये वाढ झाली असून ही रक्कम आता 75 हजार रुपये करण्यात आली आहे.
योजनेसाठी पात्रता काय?
- जर तुम्हाला शेततळे बांधायचे असेल तर त्यासाठी शेतकऱ्याच्या नावावर कमीत कमी ०.६० हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे.
- ज्या जमिनीवर शेततळे बांधायचे आहे ती जमीन तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे गरजेचे आहे.
- शेततळे योजनेसाठी अर्जदार शेतकऱ्याने मागेल त्याला शेततळे सामूहिक शेततळे किंवा भात खाचरातील बोडी किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनेच्या माध्यमातून शेततळ्यासाठी कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.
कुठे कराल अर्ज?
मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आता शेततळ्यासाठी ७५ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते. यासाठी राज्य सरकारच्यामहाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. शेततळे योजनेसाठी अर्ज सुरू झालेले आहेत. यासाठी जमीनीचा सात-बारा आणि 8-अ उतारा, आधारकार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, हमीपत्र आणि जातीचा दाखला आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.