सोपान भगत
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्याची एकेकाळी ऊस उत्पादनाचे आगार अशी ओळख होती. मात्र, आता या उसाच्या आगारातील शेतकरी केळी लागवडीकडे वळले आहेत.
तालुक्यात मुळा, प्रवरा, गोदावरी नदी, त्याचबरोबर मुळा, भंडारदरा धरणाचा कालवा येतो. त्यामुळे अनेक दिवसांपासून हा तालुका बागायती पट्टा म्हणून ओळखला जातो. मुबलक पाणी असल्याने बहुतांश शेतकरी उसाच्या पिकांवर भर देत असतात.
त्यामुळे मुळा व ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाने अनेक दिवसांपासून सुरू आहेत. जिल्ह्यातील विक्रमी गाळप करणाऱ्या कारखान्यांच्या यादीत अग्रेसर असतात. इतरही अनेक साखर कारखान्यांना नेवासा तालुक्यातून ऊस पुरवठा मोठ्या प्रमाणावर केला जातो.
त्यामुळे तालुक्याला उसाचे आगार म्हणूनच ओळखले जात होते. मात्र, गेल्या चार-पाच वर्षांत ऊसतोडीबाबतच्या नियोजनाच्या अभावामुळे ऊसतोड वेळेत मिळत नाही. मिळाली तरी त्यास पैसे मोजावे लागतात. त्यातच हुमनी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो.
याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. त्यामुळे शेतकऱ्यांची ऊस लागवडीबाबत नकारात्मक भूमिका झाली आहे. त्या तुलनेत केळीला चांगले दर मिळतात.
त्यामुळे उसाच्या आगारात सध्या केळी लागवडीवर भर दिला जात आहे. जूनपासून जवळपास तालुक्यात एकुण दहा कृषी मंडळांत ७८४ हेक्टर केळीची लागवड झाली आहे. पुढील दोन महिन्यात आणखी मोठ्या प्रमाणात केळी लागवड होणार आहे.
मंडळ निहाय केळी लागवड
नेवासा बुद्रुक ६७ हेक्टर, नेवासा खुर्द- ४०, सलाबतपूर- ८५, कुकाणा १०५, चांदा-९५, घोडेगाव- ७३, वडाळा बहिरोबा- ५५, प्रवरासंगम- ६९, देडगाव-१२०, भानसहिवरा ७५.
दरवर्षी ऊस लागवड करत होतो. परंतु, उसाला वेळेत तोड मिळत नाही. मिळाली तर पैसे मोजावे लागतात. त्यामुळे आता दहा वर्षांपासून केळीचे उत्पादन घेतो. येणारे व्यापारी कटिंगसह सर्व तेच करतात. केवळ वजन काट्यावर आपण पेमेंट घेण्यासाठी जातो. सध्या २८ रुपये प्रति किलो प्रमाणे केळाची कटिंग सुरू आहे. - बापूसाहेब कुसाळकर, उत्पादक शेतकरी, भेंडा खुर्द.
बारा वर्षापासून प्रतिवर्षी पाच एकरांपर्यंत केळीची लागवड करतो. केळीला आठ ते दहा रुपये प्रति किलो भाव मिळाला तरी उसापेक्षा दुप्पट पैसे होतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा आता केळीकडे कल वाढला आहे. - गणेश आगळे, केळी उत्पादक, शेतकरी, देवगाव.
दोन-तीन वर्षांपासून भारतीय केळीला बाहेर देशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे देशातील विविध कंपन्यांमार्फत केळीची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. त्यामुळे सध्या दररोज नेवासा तालुक्यातून तीनशे ते चारशे टन माल कटिंग केला जातो. त्या केळीला वीस ते पंचवीस रुपये प्रति किलोपर्यंत दर दिला जातो. - पिंटू वाघडकर, केळी व्यापारी, भेंडा.