यावर्षी मे महिन्याच्या दहा तारखेनंतर अवकाळी पावसाने कऱ्हाड तालुक्यात ठिकठिकाणी हजेरी लावल्याने पेरणीपूर्व मशागतीची कामे बळीराजांनी उरकून घेतली आहेत. खरीप हंगामातील पेरणीला अद्याप वेळ असला तरी सध्या तालुक्यात अनेक ठिकाणी ऊस लागणीसाठी बळीराजाची लगबग सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
अलीकडे उसाची लागण करताना कांडीऐवजी उसाची रोपे लावण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असून, त्यासाठी तालुक्यातील सर्वच रोपवाटिका सज्ज झाल्या आहेत. उसाचे विविध प्रकारचे वाण असले तरी कऱ्हाड तालुक्यातील बहुतांश शेतकरी ८६०३२ या प्रजातीच्या उसाच्या वाणाला जास्तीत जास्त पसंती देतात असे दिसून आले आहे.
कऱ्हाड तालुक्यात मे महिन्याच्या दहा तारखेनंतर अवकाळी पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावली. या पावसामुळे बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीसाठी हा पाऊस समाधानकारक ठरला आहे.
अवकाळी पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकून घेतली आहेत. मान्सूनची सुरुवात झाल्यानंतर किंवा कऱ्हाड तालुक्याच्या दक्षिण भागात सात जूननंतर धूळवाफ पेरणी केली जाते. पेरणीसाठी लागणारे बी-बियाणे जमा करण्यात सध्या शेतकरी वर्ग मग्न आहे.
गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने नगदी पीक असलेल्या उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले होते. यंदा चांगला पाऊस होईल, अशी आशा शेतकरी वर्गाला लागून राहिली आहे. त्यामुळे तालुक्यात बहुतांश ठिकाणी ज्या शेतकऱ्यांच्या शेतीला स्वतःचे पाणी उपलब्ध आहे. त्या शेतकऱ्यांनी ऊस लागणीस प्रारंभ केला आहे.
पूर्वीपासूनच उसाची लागण उसाची कांडी पुरून करण्याची पद्धत पूर्वापार चालत आली आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून उसाची रोपे लावण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यातच यंदा पाऊस काळ कमी झाल्याने आडसाली उसाची वाढ योग्य त्या प्रमाणात झालेली नाही, त्यामुळे ऊस लागणीसाठी उसाचा तुटवडा यंदा जाणवणार आहे.
गेल्यावर्षी पाऊस काळ कमी झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी उसाची कांडी लागण किंवा रोपे लागवड केली नव्हती. त्यामुळे अनेक रोपवाटिकाधारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. रोपवाटिकेत भरमसाठ रोपे तयार असूनही मागणी नसल्याने रोपवाटिकाधारकांना आर्थिक फटका बसला होता. मात्र यावर्षी मान्सून लवकर येईल, असा अंदाज वर्तवण्यात आल्याने अनेक शेतकऱ्यांनी रोपांचे बुकिंग केले आहे. यावर्षी चांगला व्यवसाय होईल. - शेखर पाटील, संचालक, श्री गणेश रोपवाटिका, हेळगाव
अधिक वाचा: White Grub Management हुमणी नियंत्रणाचे कमी खर्चातील सोपे उपाय कोणते?