Join us

शेतकऱ्यांनी खरिपातील नुकसान भरून काढण्यासाठी टोमॅटोची लागवड केली पण गणित फसलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 16:39 IST

पारंपरिक पिकातून मिळत असलेल्या अत्यल्प उत्पादनामुळे अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड करून रात्रंदिवस कष्ट घेत मळा फुलविला; मात्र, तोडणी करून बाजारात येताच मिळत असलेल्या पाच-दहा रुपये दराने टोमॅटोची लालीच फिकी झाली.

करमाळा : पारंपरिक पिकातून मिळत असलेल्या अत्यल्प उत्पादनामुळे अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड करून रात्रंदिवस कष्ट घेत मळा फुलविला; मात्र, तोडणी करून बाजारात येताच मिळत असलेल्या पाच-दहा रुपये दराने टोमॅटोची लालीच फिकी झाली.

करमाळा तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी खरिपातील नुकसान भरून काढण्यासाठी टोमॅटोची लागवड केली. मशागतीपासून ते तोडणीपर्यंत मोठा खर्चही केला.

वन्य प्राण्याकडून नुकसान होऊ नये म्हणून डोळ्यात तेल घालून जीव धोक्यात घालून पिकांची राखण केली. यामुळे लागवड क्षेत्र टोमॅटोच्या लालीने भरून गेले.

दोन पैसे पदरात पडतील या आशेने टोमॅटोची तोडणी केली. मात्र, बाजारात विक्रीसाठी दाखल करताच शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाल्याचे दिसून आले. कष्ट करून पिकविलेल्या टोमॅटोला पाच ते दहा रुपये प्रति किलो एवढा भाव मिळत आहे.

एकीकडे निसर्गाचे संकट, विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव, वन्य प्राण्यांचा त्रास असताना दुसरीकडे मात्र पिकांना कवडीमोल भाव मिळत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

टोमॅटोला सध्या कमी दर मिळत आहे. केवळ पाच ते दहा रुपये प्रतिकिलो भाव आहे. उन्हाळ्यात दर वाढण्याची अपेक्षा होती. मात्र दरातील घसरणामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत आहे. यामुळे शेतकरी नाराज होत असले तरी ग्राहकांमध्ये मात्र कमी दरात टोमॅटो मिळत असल्याने समाधान दिसून येत आहे. - अलिम बागवान, व्यापारी करमाळा

नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात टोमॅटो लागवड करण्यासाठी सुरुवातीला ट्रॅक्टरने उभी, आडवी खोल नांगरट करावी लागते. महिनाभर जमीन चांगली तापल्यानंतर जमिनीचा पोत सुधारतो व पीक चांगले येऊन चांगला भाव मिळतो. त्या आशेनेच टोमॅटो लागवड केली; परंतु, या वर्षी टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत आहे. - मनोहर मोरे, शेतकरी रोसेवाडी

टॅग्स :टोमॅटोबाजारशेतकरीमार्केट यार्डसोलापूरभाज्या