Join us

टोकन पद्धतीने सोयाबीन पेरणीला शेतकऱ्यांचे प्राधान्य, कमी बियाणांच्या वापरात उत्पादनही अधिक!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 10:30 AM

पेरणीसाठी बळीराजा सज्ज, या पद्धतीने सिंचनासह जाते सोपे

पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी शिवारात पारंपरिक पेरणीबरोबर अधुनिक पद्धतीने खरीप पेरणीवर भर दिला जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी यंदाच्या खरिपात बेडवर मानवचलित टोकन यंत्राच्या साह्याने सोयाबीन पिकाची लागवड करण्याला प्राधान्य देत आहेत.

गतवर्षी अत्यल्प पाऊस, पावसाचा खंड, गारपीट, अतिवृष्टी अशा अनेक संकटांतून शेतकऱ्यांनी खरीप, रब्बी पिकांचे उत्पादन घेतले. उत्पादनात मोठी घट झाली, तर मिळालेल्या शेतमालाला समाधानकारक भाव मिळाला नाही. यामुळे शेतकऱ्यांध्ये नाराजी होती. मात्र, असे असले तरी यंदा पुन्हा पेरणीसाठी बळीराजा सज्ज झाला आहे.

आधुनिक पद्धतीने शेती करण्याची कास पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथील शेतकऱ्यांनी धरली आहे. या शेतकऱ्यांनी यंदा बेड पद्धत वापरून टोकनद्वारे सोयाबीन लागवड करीत आहे. ही पद्धती किती यशस्वी ठरते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. उत्पादन वाढल्यास शेतकरी हीच पद्धत वापरतात.

कृषी विभागाचे मार्गदर्शन

रविवारी आहेरवाडी शिवारातील  काही भागात चांगला पाऊसा झाल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणीस सुरुवात केली.

विशेष करुन कृषी सहायक एच.एस. मोरे यांच्या मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने टोकन यंत्राद्वारे बेडवर सोयाबीन पिकाची लागवड पेरणी केली.

कमी बियाणांचा वापर, उत्पादन अधिक

* बेडवरील टोकन यंत्र सोयाबीन बियाणे लागवड पद्धतीत आवशकतेनुसार एकरी १० ते १२ किलो बियाणे लागते. तर चार इंच लांबीवर बी टोकन होते. या पद्धतीनुसार लागवड केल्यास रोपांची संख्या मर्यादित राहून हवा खेळती राहते.

* कीटकनाशक आणि मशागतीसाठी मोकळी जागा राहते, तसेच रोपांची संख्या कमी राहत असल्याने शेंगा अधिक लगडून एकरी १० ते १२ क्विंटल उत्पादनही होते.

सिंचनासही जाते सोपे

शिवाय पावसाचा खंड पडल्यास बेडजवळील सरीने, तुषार तसेच ठिबक सिंचनाद्वारे पाणीही देण्यास या प्रक्रियेमुळे मदत होते. त्याचबरोबर या भागात ज्या ठिकाणी समाधानकारक पाऊस पडलाय तेथे हळद बेणे लागवड सरू करण्यात आली आहे.

टॅग्स :सोयाबीनलागवड, मशागतपेरणीशेती