जमीन सातबारा उताऱ्यावरील मागण्यांसंदर्भात शासनाच्या उदासीनतेमुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले असून 25 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यालयांवर मोर्चा काढण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त करून त्यांचे लिलाव करणे न थांबवल्यास नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक व जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा शेतकरी संघर्ष संघटनेने यापूर्वीच दिला होता. आज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासकांसोबत झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याआधी 14 जून रोजी याच संदर्भात मोर्चा काढण्यात आला होता त्यानंतर देखील शासनाने दखल न घेतल्याने 25 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता मोर्चा देण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आंदोलनकर्त्यांनी केले आहे. दरम्यान, आज जिल्हा बँकेच्या प्रशासकांची दोन तास बैठक झाली. या बैठकीत सुधाकर मोगल, भगवान बोराडे, कैलास बोरसे व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठक निष्फळ ठरल्याने मोर्चा आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आंदोलकांनी दिली.
नक्की मागण्या काय?
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त करून त्यांचे लिलाव करणे थांबवावे यासाठी हे आंदोलन सुरू आहे. शेती उपयोगी वाहनांचे व शेतकऱ्यांच्या सातबारावर त्यांच्या नावाच्या ऐवजी बँकेचे किंवा विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे नाव लावण्याची प्रक्रिया थांबवावी ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. शासनाने जिल्हा बँक करत असलेली कार्यवाही थांबवावी या मागणीसाठी महिला जास्त दुसरा मोर्चा काढावा लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले होते.
संबंधित वृत्त: जमिनी जप्त करून लिलाव करणे न थांबवल्यास बँकांवर मोर्चा काढण्याचा इशारा