ग्रामीण भागामध्ये अनेकवेळा विजेचा लपंडाव सुरु असतो. त्यामुळे अनेक शेतकरी ऑटो स्विच बसवितात; परंतु वीजपुरवठा सुरु झाल्यानंतर विद्युतपंप तत्काळ सुरू होत असला तरी एकाचवेळी सगळे विद्युत पंप सुरू होत असल्याने रोहित्रावर भार पडत आहे. परिणामी केबल, रोहित्र जळण्याच्या घटना घडत असल्याचे महावितरणच्या लक्षात आले आहे. त्यामुळे ऑटो स्विच काढून कॅपॅसिटर बसवावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. ऑटो स्विच दिसले तर महावितरणकडून कारवाई केली जाणार आहे. यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे.
कॅपॅसिटर बसवल्याने ३० टक्के वीज बचत होईल
■ महावितरणकडून प्रत्येक विद्युत पंपासाठी कॅपॅसिटर बसविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
कॅपॅसिटर बसविल्यानंतर विद्युत पंप जळण्याच्या प्रमाणात घट होऊन, ३० टक्के विद्युतभार कपात होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
■ प्रत्येक शेतकऱ्याने कॅपॅसिटर वापरणे अनिवार्य केले आहे; परंतु त्यासाठी शेतकऱ्यांना ५०० रुपयांपर्यंत भुर्दंड होणार आहे.
रोहित्र जळण्याच्या घटना कमी होणार !
ऑटो स्विच काढल्यानंतर एकाच वेळी लागणारा विद्युत भार कमी होणार आहे, तसेच रोहित्र जळण्याचेदेखील कमी होणार आहे. वीज आल्यानंतर तत्काळ सर्वच विद्युत पंप सुरू होतात. यामुळे एकाचवेळी रोहित्राला विद्युतभार सहन न झाल्याने फ्यूज जातो. तसेच विद्युत पंपाला आवश्यक वीजपुरवठादेखील होत नाही. परिणामी पिके जोमात असतानाच अनेकवेळा रोहित्र जळण्याच्या घटना घटतात. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे.
काही काळासाठी वीज खंडित करणार
महावितरणच्या आकडेवारीनुसार ९० टक्के शेतकऱ्यांकडे ऑटो स्विच बसविले आहेत. प्रथम कारवाईत ऑटो स्विच आढळणाऱ्या शेतकऱ्यांची काही काळासाठी विद्युत खंडित केली जात आहे. मात्र शेतकऱ्यांनी वारंवार अशाच प्रकारचा गुन्हा केल्यास महावितरणकडून दंडात्मक कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.