निसर्गाच्या लहरीपणामुळे निसर्गचक्रामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे. त्याचा दुष्परिणाम पिकांच्या उत्पादनावर होत आहे. कधी अवकाळीमुळे पिके नष्ट झाली, तरी कधी अती उष्णतेमुळे पिके जळून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. फेब्रुवारीत मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाल्याने गव्हाच्या उत्पादनावर परिणाम होणार असल्याच्या भीतीने शेतकरी धास्तावले आहेत.
शेतमालाचे सतत उतरणारे भाव व निसर्गातील बदलामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना आता फेब्रुवारीतील उष्णतेने गव्हाच्या वाढीवर परिणाम होत आहे. त्यामुळे गव्हाच्या ओंब्याची वाढ खुंटली आहे. उष्णतेच्या झळांमुळे गव्हाच्या उत्पादनात अंदाजाच्या तुलनेत मोठी तूट दिसून येत आहे. गव्हाच्या पिकासाठी थंडी पोषक असते. या पिकासाठी फेब्रुवारी महिना अत्यंत महत्त्वाचा असून, हा महिना म्हणजे गव्हाचे दाणे भरण्याचा कालावधी समजला जातो.
गहू, हरभरा यांना पोषक हवामान म्हणजे हिवाळा, जेवढी थंडी जास्त, तेवढी ती गहू आणि हरभरा या पिकांना पोषक असते. मात्र, हवामान विभागाने फेब्रुवारीत तापमान वाढीचा अंदाज व्यक्त केला होता, त्यानुसार या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन गव्हाचे दाणे भरण्याच्या काळात तापमानवाढीचा फटका बसल्यास गहू उत्पादनावर विपरित परिणाम होण्याच्या भीतीने गव्हाचे उत्पादन घेणारे शेतकरी धास्तावले आहेत.
कांद्यालाही बसतोय फटका
रब्बीतील ज्वारी, हरभरा आणि गहू ही मुख्ये पिके आहेत. फेब्रुवारी महिन्यात थंडी कमी पडत असून, त्याचा ज्वारी, हरभरा पिकांच्या उत्पादनावर फारसा परिणाम होणार नाही. पण, यंदा गहू लागवड उशिरापर्यंत चालली. त्यामुळे गव्हाच्या उत्पादनावर काहीसा परिणाम होऊ शकतो. उशिराने लागवड झालेल्या कांदा पिकालाही फटका बसू शकतो, असे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
उष्णतेचा पिकांना तडाखा
• गेल्या काही वर्षापासून फेब्रुवारी महिन्यात उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसत आहे. उष्णतेच्या झळांमुळे गव्हाच्या उत्पादनात अंदाजाच्या तुलनेत मोठी तूट येत आहे. यावर्षी जेमतेम पावसावर खरीप हाती आला.
• रब्बीसाठी पडलेला कमी पाऊस, विहिरीची कमी झालेली पाणीपातळी, यामुळे घाई करून पेरणी केलेल्या ऑक्टोबर, नोव्हेंबरमधील गव्हाला थंडीच मिळाली नाही. उष्ण हवामानामुळे वेळे अगोदर वाढ खुंटून गव्हाला ओंबी निघाली, डिसेंबर, जानेवारीत पेरणी झाली. त्या पिकाला थोडीफार थंडी मिळाली.
• त्यासोबतच सततचे धुके व त्यानंतर फेब्रुवारीच्या सुरुवातीला व मध्यात २८ ते ३० अंश सेल्सिअस तापमानाचा विपरित परिणाम गहू पिकावर होऊन उत्पादनात फार मोठ्या प्रमाणात घट येण्याच्या शक्यतेने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
• त्यातच तापमान वाढ आणि पाण्याने गाठलेला तळ चिंतेचा विषय बनला आहे.